दिल्ली : रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी सांगितले की, तंत्रज्ञानाचा वेग आणि हरित इंधन यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicle) खर्च आणखी कमी होईल आणि पुढील दोन वर्षांत ते पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने येतील.
यावेळी गडकरींनी देशात बनवलेले स्वस्त इंधन (Fuel) स्वीकारण्याच्या मुद्द्यावर भर दिला आणि सांगितले, की हे इंधन लवकरच प्रत्यक्षात येईल. ज्यामुळे प्रदूषण (Air Pollution) सुद्धा कमी होईल. तसेच राजधानी दिल्लीच्या वातावरणात सुधारणा होईल. खासदारांना वाहतुकीसाठी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा (Hydrogen Technology) वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, हायड्रोजन हा लवकरच सर्वात स्वस्त इंधनाचा पर्याय असेल.
गडकरी म्हणाले की, मी जास्तीत जास्त 2 वर्षात सांगू शकतो की, इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटोरिक्षा सारखीच असेल. लिथियम-आयन बॅटरीच्या किमती कमी होत आहेत. झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरीची ही केमिस्ट्री आम्ही विकसित करत आहोत. जर पेट्रोलवर (Petrol) तुम्ही 100 रुपये खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक वाहनावर तुम्ही 10 रुपये खर्च कराल.
दरम्यान, देशात इलेक्ट्रिक वाहनांना अद्याप अपेक्षित प्रमाणात मागणी नाही. चार्जिंग स्टेशनची (Charging Station) कमतरती हे महत्वाचे कारण यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता खासगी कंपन्याही मदत करण्यास पुढे येत आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) देशभरात 'हायपरचार्जर्स' नावाने चार्जिंग नेटवर्क (Charging Network) उभारणार आहे. या 'हायपरचार्जर'च्या मदतीने ओला ई-स्कूटर 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती.

0 Comments