धुळे- जिल्हाधिकारी कार्यालयापासून बऱ्याच अंतरावर क्युमाईन क्लबजवळ आपल्या न्याय्य मागण्यांसाठी साक्री तालुक्यातील दुसाणे येथील एक वृद्ध दाम्पत्य 14 मार्च पासून आमरण उपोषणास बसले होते. दूर्दैवाने प्रकृती बिघडल्याने सुधन्वा विठ्ठल भदाणे या ज्येष्ठ नागरीकाचा आमरण उपोषणाने झालेला मृत्यु ही बाब चिंताजनक असून आमरण उपोषणकर्त्यांविषयी संवेदना लोप पावत असल्याचे हे लक्षण आहे. कदाचित हे दाम्पत्य जिल्हाधिकारी कचेरी समोर उपोषणास बसले असते तर त्यांच्याकडे आपले कार्यालय व आरोग्य यंत्रणा यांनी समजूत घालून, न्यायासाठी मध्यस्थी करून लक्ष दिले असते व त्यांचा हकनाक बळी गेला नसता असे आमचे मत असून आमरण उपोषणकर्त्यांचा दुसरा बळी जाऊ द्यावयाचा नसेल तर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार्या आंदोलकांना जिल्हाधिकारी कचेरीसमोरच बसण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्र सेवादल साक्री रोड शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्र सेवा दल साक्री रोड शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, पूर्वी घडलेल्या केवळ एका घटनेमुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांचा मुक्काम जिल्हाधिकारी कचेरी समोरून जेलरोड परिसरात हलविला हे शासनाला आलेल्या पूर्वानुभवावरून उचितच आहे. मोर्चे, धरणे, लाक्षणिक उपोषण लांब अंतरावरच असले पाहिजेत मात्र जे आंदोलक आमरण उपोषणकर्ते जमावबंदीच्या आदेशाचे पालन करून आंदोलन करणार असतील तर त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कचेरी समोरच बसण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून आपली यंत्रणा, आरोग्य यंत्रणा जवळच अशा आंदोलनकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांचे गार्हाणे ऐकून समस्या सोडविण्यास मदत होईल व दुसरा बळी जाणे टळेल. पूर्वी कलेक्टर कचेरी समोर बसणाऱ्या उपोषणकर्त्यां आंदोलनाची ज्या तत्परतेने आपल्या कार्यालयाकडून दखल घेतली जात असे तसे आता होत नाही हे आम्हाला खेदाने नमूद करावे लागत आहे. कलेक्टर कचेरी आवारात आपल्या न्याय्य मागणीसाठी घोषणाबाजी आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांवर जेव्हा-जेव्हा गुन्हे दाखल झाले त्यात विशेषत: गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी अशा वर्गातीलच कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ही बाब घटनेने दिलेल्या हक्कानुसार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सनदशिर मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर जुलूम व अन्याय करणारी आहे. याबाबतही भेदभाव होऊ नये व विशेष बाब म्हणून आमरण उपोषणकर्त्यांची विशेष काळजी घ्यावी व सी.सी.टी.व्ही.च्या कार्यकक्षेत आमरण उपोषणकर्त्यांना कलेक्टर कचेरी समोरच बसण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्र सेवा दल साक्री रोड शाखेने केली. आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर राष्ट्र सेवा दल साक्री रोड शाखेचे भास्कर बापू पाटील, मोतीलाल तोलाणी, बापूजी अहिरे, प्रकाश मोरे, शांताराम जाधव, सईद मन्सुरी, जगदीश हिरे, प्रमोद बाविस्कर, मनिष मंदान, देविदास सोनवणे, मोहन परदेशी, गो. पि. लांडगे आदी सैनिकांच्या सह्या आहेत.
0 Comments