Header Ads Widget

धुळे तालुक्यात शेतीसाठी दिवसा वीज शक्य



कापडणे : प्रत्येक ग्रामपंचायतीने किंवा शेतकऱ्‍यांनी दहा-पंधरा एकर गायरान किंवा इतर क्षेत्र उपलब्ध करून द्या. प्रतिवर्ष एकरी तीस हजार भाडे मिळेल. तीन टक्के दर वर्षी वाढ मिळेल.

त्यावर दहा बारा कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प उभा राहील. तालुक्यातील शेतीला दिवसाही वीज उपलब्ध होईल. त्यासाठी ग्रामपंचायतीसह शेतकऱ्‍यांनी पुढे येण्याचे आवाहन धुळे ग्रामीणचे उपअभियंता संजय पाटील यांनी केले.

येथील महावितरणच्या कार्यालयात शेतकरी वीज ग्राहक यांचा संवाद मेळावा झाला. त्यावेळी धुळे ग्रामीणचे उपअभियंता पाटील मार्गदर्शन करीत होते. यावेळी कनिष्ठ अभियंता अंजली हिंगमिरे, किशोर बोरसे, दगा मोरे, शशिकांत बोरसे, रमेश पाटील, शांतूभाई पटेल, साहेबराव पाटील, प्रकाश माळी आदी उपस्थित होते. उपअभियंता पाटील म्हणालेत, सौर ऊर्जा हा दहा ते बारा कोटीचा प्रकल्प आहे. कृषी धोरण २०२० नुसार मार्च अखेरपर्यंत पन्नास ते पासष्ट टक्केपर्यंत सवलत आहे. मार्च अखेरपर्यंत या सवलतीचा फायदा घ्या. तुमच्या मागणीनुसार समस्या सोडविण्याचा प्रयत्न राहील. घरपोच कृषी वीजबील पाठविण्याची व्यवस्था झाली आहे. नवीन आरएफ प्रकारचे मीटर बसविण्याची व्यवस्था झाल्यास रीडिंग घेण्याचीही आवश्यकता राहणार नाही.

शेतकरी संघटनेचे प्रांतिक सदस्य शांतूभाई पटेल, कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव साहेबराव पाटील, रमेश पाटील आदींनी ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे, वीजपुरवठा खंडित करण्याची समस्या मांडली. त्यांना उपअभियंता पाटील यांच्याकडून समाधान करण्यात आले. दरम्यान, मेळाव्यातील खुर्च्यांवर अधिकारी न बसता शेतकऱ्‍यांसोबतच जमिनीवर बसून संवाद मेळावा झाला. थकीत संपूर्ण वीजबिल भरणाऱ्‍या ग्राहकांचा सन्मान केला. कनिष्ठ अभियंता हिंगमिरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments