धुळे : शिवसेनेला वेठीस धरत सुरत, नंतर गुवाहाटी येथे पळालेल्या पक्षातील गद्दारांना इतिहास माहीत नसावा. शिवसेना संपवायला निघालेले नंतर पाच ते दहा वर्षांत स्वतः संपलेले आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे, अशी जाणीव करून देत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आमचा पाठिंबा असल्याची भूमिका येथील शिवसेनेच्या जिल्हा शाखेने रस्त्यावर उतरत शक्तीप्रदर्शनातून मांडली.
सहसंपर्कप्रमुख माळी म्हणाले, काही गद्दार शिवसेना संपवायला निघाले आहेत. मात्र, शिवसेना संपणार नाही. जे सत्ता, पैशांसाठी पक्षातून बाहेर पडले ते पाच ते दहा वर्षात स्वतः संपले हा इतिहास आहे. ते गद्दारांनी विसरु नये. शिवसेना आमच्यासारख्या नवीन नेतृत्वाला पाठबळ देऊन भगवा पुन्हा जोमाने फडकवेल, असा विश्वास आहे. जिल्हा शिवसेना खंबीरपणे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख ठाकरे यांच्या पाठीशी राहील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्याच वाटेने मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाटचाल करीत आहेत. ज्या भाजपने शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला. त्यांच्यासोबत शिवसेनेतील गद्दार सत्तेसाठी हातमिळवणी करीत आहेत. त्यामुळे काही फरक पडत नाही. शिवसैनिकाला सत्तेचा वाटा, मंत्रिपद दिले. त्यांना आणखी काय हवे होते, असा प्रश्नही सहसंपर्कप्रमुख माळी यांनी उपस्थित केला. उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाचे फुटीर मंत्री, आमदारांविरुद्ध घोषणाबाजी करत संतप्त भावना व्यक्त केल्या.
सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, नरेंद्र परदेशी, किरण जोंधळे, डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, कैलास पाटील, संदीप सूर्यवंशी, ललित माळी, प्रवीण साळवे, भटू गवळी, सचिन बडगुजर, कैलास मराठे, संजय जवराज, भरत मोरे, हेमा हेमाडे, संदीप चव्हाण, प्रमोद चौधरी, विनोद जगताप, पिंटू पाटील, छोटू माळी आदी उपस्थित होते.
0 Comments