मराठा सेवा संघप्रणीत संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेने विधवेच्या सन्मानातून शासनाचे सुयोग्य धोरण अमलात आणणे तुमच्या-आमच्या हाती असल्याचा आदर्शवत संदेश दिला. येथील आधारनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष यामिनी खैरनार, विभागीय अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाध्यक्षा शीतल पाटील, आरोस्तोल पाटील, आशा पाटील, मंगला पाटील, सुशीला पाटील, प्रतिभा पाटील, वंदना सूर्यवंशी, निर्मला वाणी, मंदा मोरे, शैला भामरे, बेबी पवार, दीपिका पाटील, साक्षी देवरे, सोनल भामरे आदी उपस्थित होते.
स्थितीला नमविण्याची हिंमत बळावलीप्रा. पाटील म्हणाल्या, की शासकीय धोरणात्मक बदलाचा सकारात्मकतेसह आनंदाने स्वीकार व्हावा. बदलाची अंमलबजावणी महिलांचा पुढाकार व कृतीतून व्हावी. पतीच्या निधनानंतर पत्नीचा कपाळावरील कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवे काढून तिची अवहेलना होताना दिसते. तिचा जीवनसाथी, भक्कम आधार गेल्यावर अलंकार काढून होणारे मानसिक खच्चीकरण रोखले पाहिजे. पती गेल्यानंतर ती कुटुंबाचा रहाटगाडा निर्भीडपणे सांभाळते. त्यामुळे अनिष्ट रूढी, प्रथा बंद व्हाव्यात. या विचारातून सीमा पाटील यांचा सन्मान केला. त्यासाठी त्यांची मानसिकता तयार करण्यात आली.
गहिवरलेल्या सीमा पाटील म्हणाल्या, की सन्मानाची परतफेड मी कधी करू शकत नाही. पती गेल्यानंतर हिमतीने घर सांभाळत अंगणवाडीत काम करते. इतर काही महिलांकडे पोळ्या लाटण्याचे काम करते आणि नेटाने संसाराचा गाडा हाकते आहे. तरीही पतीची उणीव भासत असते. पतीची सोबत नाही, त्यांच्या आठवणी दाखवायच्या नाहीत हा सामाजिक नियम काही कळाला नाही; परंतु, ही रीत म्हणून जगणे स्वीकारले आहे. त्यात संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेने हुरूप दिल्याने स्थितीला नमविण्याची हिंमत बळावली आहे.
0 Comments