शेवाळे (ता. शिंदखेडा) शिवारातील एका शेतात पवन सुदाम कोळी (वय १९, रा. शेवाळे) हा साथीदाराच्या मदतीने बनावट दारुचा कारखाना चालवत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. याआधारे निरीक्षक पाटील यांनी पथकाला कारवाईची सूचना दिली. पथकाने शेवाळे शिवारातील दारु कारखान्यावर छापा टाकला. संशयित कोळी व साथीदार योगेंद्र किशोर सोनवणे (वय २४, रा. प्लॉट नं. ३६, घुगे नगर, देवपूर, धुळे) बनावट दारु तयार करताना आढळले.
त्यांच्याकडून ८० हजार ६४० किमतीची देशी दारु, तीन हजार किमतीच्या हजार रिकाम्या बाटल्या, पंधरा हजार किमतीचे बूच पॅकींगचे मशिन, अडीच हजार किमतीचे पाच प्लास्टिक ड्रम, दोन हजार किमतीचे पिवळ्या रंगाचे अल्कोहोल मिटर, दोन हजार ७२० किमतीचा दारु बनविण्याचा सेंट, बूच, टाकी, स्ट्रे, गाळणी, नळ्या, दोन मोबाईल आणि विना नंबरची दुचाकी, असा एक लाख ३६ हजाराचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
पोलिस कर्मचारी किशोर पाटील यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक अधिकारी प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, धनंजय मोरे, हवालदार संजय पाटील, प्रकाश सोनार, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील यांनी ही कारवाई केली.

0 Comments