शिवसेनेतून आमदार झालेले प्राध्यापक शरद पाटील यांनी 2019 मध्ये उमेदवारी नाकारल्याने नाराजी व्यक्त करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर प्राध्यापक शरद पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्राध्यापक शरद पाटील हे शिवसेनेच्या गोटातून धुळे ग्रामीणचे माजी आमदार राहिले आहेत. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणावर फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर आमदार तसेच शिवसेनेचे शाखाप्रमुख माजी नगरसेवक देखील गेले आहेत. सध्या शिवसेनेचा संकटाचा काळ सुरू असताना धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन पुन्हा एकदा शिवबंधन हाती बांधत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे धुळे ग्रामीण मध्ये शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.
कोण आहेत शरद पाटील?
प्राध्यापक म्हणून काम केलेले शरद पाटील यांनी काँग्रेस मधून सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती...
प्राध्यापक शरद पाटील यांनी 22 ऑक्टोबर 2003 ला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
यानंतर प्राध्यापक शरद पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून धुळे ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी करत माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव केला होता.
2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी 1 ऑक्टोबर 2019 ला शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती.
त्यानंतर त्यांनी 3 जून 2021 ला पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेने विरुद्ध बंड पुकारले होते.
त्यानंतर आज 12 जुलै 2022 ला शरद पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करत घरवापसी केली आहे.

0 Comments