धुळे- शहरातील साक्री रोडवरील सिंचनभवन भिंतीलगत रस्त्याच्या मध्येच जलवाहिनीस अनेक दिवसांपासून गळती लागली होती. रोज हजारो लिटर पाणी वाया जात होते, गुरे-ढोरे, भटकी कुत्री यांची पाण्याची तहान भागत होती, वाटसरु हातपाय तोंड धुवून ‘फ्रेश’ होत होते ही सुविधा (!) जमेची बाजु असली तरी वाया जाणारे पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. रस्त्यावर रोज अनेकदा जा-ये करणाऱ्या लोकप्रतिनिधी नगरसेवक यांचाही ‘कानाडोळा’ होत होता, म्हणजे ‘पाहून न पाहिल्यासारखे’ करत होते. या गळतीचे चित्रण समाजमाध्यम व विविध वृत्तपत्रातून झळकले. महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसचिव मनोज अरविंद वाघ यांनी ‘आपली तक्रार, संबंधित विभागाकडे निवारणासाठी पाठविली आहे’ असा मला व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठविला होता. उशिरा का होईना पाणी पुरवठा विभागाने दखल घेऊन गळती होत असलेले ठिकाण खोदून आज गळती थांबविली आहे. ‘देर आये, दुरुस्त आये’ का असेना, नक्कीच ते अभिनंदनास पात्र आहेत, पण हे अभिनंदन त्यांनी ‘जरतारी’ समजावे. पुन्हा गळती होऊ नये याची त्यांनी दक्षता घेतलीच पाहिजे. पण जो अवाढव्य खड्डा खोदून आज रस्त्याच्या वाहतुकीस राज्यात नावलौकिक असलेल्या आमच्या शिस्तबद्ध (!) साक्री रोडवर वाहतुक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातून लवकर सुटका करावी एव्हढीच माय-बाप पालिकेकडून जनतेची अपेक्षा आहे. नाहीतर ‘‘बये जे व्हतं तेच बरं होतं, जेम ना तेम कपायले डेम’ असे म्हणण्याची पाळी वाटसरुंवर येऊ नये एव्हढीच विनम्र अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी धुळे महानगरपालिकेकडे केली आहे.
- गो.पि. लांडगे, ज्येष्ठ पत्रकार,
मो. 9422795910
0 Comments