स्वतंत्र मराठवाडा संकल्पनेस विरोध केला की, या मागणीचे समर्थक मराठवाड्याच्या मागासलेपणाचा मुद्दा उपस्थित करतात.. मग पश्चिम महाराष्ट्राशी तुलना केली जाते.. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विकास पळविला असा आरोपही केला जातो.. मात्र असा आरोप करताना अशी पळवापळवी करायला तुम्हाला अडविलं कोणी होतं हे मात्र सांगितले जात नाही.. मुख्यमंत्रीपद चार - पाच वेळा मराठवाड्याच्या वाट्याला आलं.. अनेकदा महत्वाची खाती देखील मराठवाड्याकडे होती.. तरीही विकासाची गंगा आपल्याला खेचून आणता आली नसेल तर त्याला पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर आपले करंटेपण जबाबदार आहे.. मुळात नेत्यांमध्ये विकासाची धमकच नसेल तर स्वतंत्र मराठवाडा झाल्यानंतर तरी कसा आणि काय विकास होईल..? फार तर राजकीय बेकारांना काम मिळेल, सत्तेचे मलिदे लाटले जातील.. याशिवाय काही होणार नाही.. शेवटी राज्य हवेवर चालत नाही त्यासाठी उत्पन्नाची साधनं देखील लागतात.. ती आहेत कुठे? प्रत्येक वेळी केंद्रावर अवलंबून राहून विकास होणार कसा ? भावनेचं राजकारण करणारे याचा विचार करीत नाहीत..
याच अनुषंगानं आणखी एक मुद्दा मला स्पष्ट करावा वाटतो.. .. आम्ही आमच्या गरिबीचं, मागासलेपणाचे एवढं मार्केटिंग केलंय की, पुण्या - मुंबईत आमची हीच प्रतिमा तयार झाल्यानं उद्योग इकडं यायला अजूनही तयार नाहीत.. त्यामुळं कायम रडगाणं गाणारी आपली मानसिकता आता बदलावी लागेल.. ती बदलताना आता आमचा मराठवाडा पुर्वीसारखा भुके कंगाल राहिलेला नाही हे ही सांगावं लागेल.. मराठवाडा आता विकसनशील प्रांत आहे हे पुण्या - मुंबईला ओरडून सांगावे लागेल... आणि अलिकडच्या काळात मराठवाड्याने केलेल्या प्रगतीच्या, मराठवाड्यातील सकारात्मक बदलाच्या कहाण्या बाह्य जगाला सांगाव्या लागतील तरच मुंबईकरांचा मराठवाडयाकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि नवे उद्योग इकडं येऊ लागतील..
मराठवाड्यात काही सकारात्मक बदल होत आहेत ते आपल्याला आणि मराठवाड्याबाहेरच्या जगाला दुर्लक्षिता येणार नाहीत..उदाहरणाखातर मी बीड जिल्हा घेतो.. दळणवळणाच्या साधनांचा पूर्ण अभाव असलेल्या बीड जिल्ह्यातून आता नऊ राष्ट्रीय महामार्ग जात आहेत.. नागपूर - पात्रादेवी या तीर्थक्षेत्र महामार्गाचा प्रवास बीड आणि मराठवाड्यातून होणार आहे.. बीडला रेल्वे नव्हती ती आता आष्टी पर्यत आली आहे.. पुढील वर्ष - दोनवर्षात बीड थेट मुंबई - पुण्याशी जोडले जाणार आहे.. शेतीच्या क्षेत्रात अनेक प्रयोग होत आहेत.. परंपरागत शेतीला फाटा देत नव्या शेतीची कास धरली जात आहे.. जिथं कुसळं उगवत नव्हतं तिथं फळबागा पिकू लागल्या आहेत.. माझं २५०० लोकवस्तीचं गाव आहे... इथं किमान ७५ ट्रॅक्टर्स आले आहेत.. गावांत महागड्या गाड्या, बंगले वाढले आहेत.. लोकांच्या हातात पैसा आला आहे.. हे आपण नाकारायचं कश्यासाठी? धरणांची संख्या वाढली आणि पाणी आडवाचे प्रयोग यशस्वी झाल्यानं कोरडवाहू मराठवाड्याच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.. गावात नळयोजना झाल्यानं टॅंकरवर अवलंबून असणाऱ्या गावांची संख्या कमी झाली आहे.. हा बदल लक्षणीय आहे.. पुर्वी बीड मधून भ्रुण हत्येच्या बातम्या यायच्या आता त्या बंद झाल्यात.. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चांगल्या प्रमाणात वाढली.. गावागावात शिक्षणाच्या व्यवस्था झाल्यानं मुलींच्या शिक्षणाचं प्रमाणही वाढलं.. या बदलाकडं आपण लक्ष देणार नाही का? सरासरी उत्पन्न वाढल्याने गुन्हेगारी कमी झाली.. हं उच्च शिक्षित मुलं आजही नोकरीसाठी पुण्या मुंबईतस जातात कारण मराठवाड्यात उद्योग नाहीत.. मराठवाड्यात साधनांचा अभाव असल्याने उद्योग आले नाहीत हे जरी खरं असलं तरी मागास किंवा ऊस तोडणी मजुरांचा जिल्हा म्हणून आपण जी आपली जाहिरात केली त्याचाही परिणाम उद्योग न येण्यावर झाला.. खैर जे झालं ते झालं आता आम्ही बदलतो आहोत, आमची मानसिकता आणि आमचा मराठवाडा बदलतो आहे हे ओरडून पुण्या - मुंबईला सांगावं लागेल.. तर आणि तरच मराठवाड्यात उद्योग येऊ लागतील.. ही जबाबदारी पत्रकारांची आहे असं मला वाटतं.. विभागात घडणारे छोटे मोठे सकारात्मक बदल टिपून ते पुण्या मुंबईतील वाचकांना सांगावे लागतील.. सत्ताधाऱ्यांच्या नजरेस आणून द्यावे लागतील.. असं झालं तर बघा, नक्कीच फायदा होईल..
स्वत: पुण्या मुंबईत राहून स्वतंत्र मराठवाडयाची मागणी करणं ही बदमाशगिरी आहे.. मराठवाड्यातील जनतेला या मागणी मागचं राजकारण नक्की माहिती आहे.. त्यामुळे अशा भंपकगिरीला कोणी भीक घालत नाही. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याच्या पापाचा मराठवाडा धनी होणार नाही हे नक्की....
- एस.एम.देशमुख, मुख्य विश्वस्त,
मराठी पत्रकार परिषद, मुंबई. मो. 94233 77700

0 Comments