Header Ads Widget

नंदुरबार सुरसिंगार संगीत विद्यालयाचे संचालक खान्देशातील महागायक कै. गायनाचार्य पं. श्रीपत शास्त्री यांची संगीत परंपरा



आज नंदुरबार आणि पुणे येथे ज्या महागायकाची तिसरी पिढी संगीत क्षेत्रात कार्यरत आहे आणि चौथी पिढी संगीताचे अध्ययन करीत आहे असा महागायक म्हणजे कै. गायनाचार्य पं. श्रीपत शास्त्री, महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्यांना शास्त्रीबुवा नावाने ओळखत. शास्त्रीबुवा मूळ नंदुरबारचे परंतु त्यांचे संगीत कार्यक्षेत्र धुळे असल्याने त्यांना धुळेकर शास्त्रीबुवा असे म्हणत. नंदुरबार येथील एका सुसंस्कृत घराण्यात 2 ऑक्टोबर 1902 रोजी त्यांचा जन्म झाला. वडील संस्कृत पंडित, थोरले भाऊ किर्तनकार, घरी लक्ष्मीनारायणाचे मंदिर त्यामुळे लहानपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झालेत. मोठेपणी आपण गायक व्हायचं असा ध्यास बाळ श्रीपतने घेतला. परंतु केवळ संगीत हे चरितार्थाचे  साधन होऊ शकत नाही अशा मताची वडिलधारी मंडळी होती. शालेय अभ्यास करून कारकुनी करावी हे श्रीपतला मान्य नव्हते. या वडिलधार्या मंडळींचा त्याला मन:स्वी राग यायचा. संगीताच्या ध्यासामुळे एक दिवस श्रीपत घरातील कोणालाही न सांगता बडोदे येथे पळून गेला. तेथे त्याची थोरली बहीण रहात असे. त्यावेळी तिने त्याला आग्रा घराण्याचे प्रवर्तक, पैगंबरवासी उस्ताद फैयाजखाँसाहेब राजगवई, बडोदा संस्थान यांच्याकडे नेले. खाँसाहेबांची मिन्नतवारी करून त्याने संगीताच श्रीगणेशा केला.  खाँसाहेबांकडे राहुन तेथे गुरुसेवा-गुरुपत्नीसेवा करून त्याने संगीत अध्ययन सुरु केले. अशा परिस्थितीत संगीत शिक्षण घेऊन बर्यापैकी प्रगती झाल्यावर धुळे येथील नगरपालिकेच्या शाळेत त्यांना संगीत शिक्षक म्हणून नोकरी लागली आणि  ते धुळ्यातच स्थायिक झाले. तेथे त्यांनी सुरसिंगार संगीत विद्यालय नावाची संस्था सुरु केली. गावातील प्रतिष्ठीत स्त्री-पुरुष, अधिकारीवर्गाच्या कुटुंबातील मुलं-मुली  व अनेक संगीतप्रेमी संगीत शिक्षणाचा लाभ घेऊ लागले. श्रीपत शास्त्री यांचे मुळ आडनाव पाठक.  पण धुळेकर रसिक मंडळींनी त्यांना शास्त्री ही पदवी दिल्यापासून लोक त्यांना शास्त्रीबुवा या नावाने संबोधू लागले. 
गावोगावी उत्सवात व संगीत संमेलनात शास्त्रीबुवांच्या मैफिली होऊ लागल्या. आकाशवाणी पुणे, मुंबई, नागपुर वगैरे केंद्रावरून त्यांच्या कार्यक्रमाचे प्रसारण होऊ लागले. मुंबईच्या ओडियन ग्रामोफोन कंपनीने 1938 साली त्यांच्या अनेक ग्रामोफोन रेकॉर्डस् काढल्यात. शास्त्रीबुवांची कीर्ति महाराष्ट्रभर पसरु लागली. त्यावेळचे अमळनेरचे नगरशेठ व प्रताप मिलचे मालक मा. कै. प्रतापशेठ हे संगीत प्रेमी होते. संगीत शिकविण्यासाठी त्यांनी शास्त्रीबुवांना पाचारण केले. दर शनिवार- रविवारी धुळ्याहून शास्त्रीबुवांना आणण्यासाठी शेठजी आपली गाडी पाठवत असत. लहानपणी मी देखील अमळनेरला आप्पांबरोबर गेल्याचे माझ्या स्मरणात आहे. एकदा अमळनेरला प्रतापशेठजींकडे अमृतसरचे लालाजी म्हणून एक व्यापारी आले होते. त्यांनी तेथे शेठजींकडे आप्पांचे गाणे ऐकले आणि त्यांच्या आवाजावर तर लालाजी फिदाच झाले. लालाजी स्वत: फार मोठे गायक होते. पंजाबी ढंगातील ठुमर्या ते उत्तम गात. लालाजी गर्भश्रीमंत तर होतेच पण त्याहीपेक्षा मनाने फार उदार होते. आप्पांचा आवाज ऐकून ते म्हणाले, “मी तुझ्यासारख्या शिष्याच्या शोधात आहे. तू माझ्याबरोबर अमृतसरला चल मी तुला गाणे शिकवतो’’. आप्पांनी आपल्या प्रापंचिक अडचणी त्यांना सांगितल्या. त्यावर  लालाजी त्यांना म्हणाले, “तुझा प्रापंचिक खर्चही मी करीन. तू काळजी करू नकोस. तू फक्त माझ्याकडे गाणे शिक’’. आप्पा एक-दीड वर्ष अमृतसरला लालाजींकडे होते. त्या काळात लालाजी धुळ्याला दरमहा आमच्या प्रापंचिक खर्चासाठी मनिऑर्डरने नियमित पैसे पाठवत असत. लालाजींकडून आप्पांना खूप शिकायला मिळाले. पैसे देऊन शिकविणारा गुरु आमच्या आप्पांना लाभला होता ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. अमृतसरहून परततांना तुला आणखी काही हवे का? असे विचारल्यावर आप्पा म्हणाले, “लालाजी मला बेगम अख्तर यांचं गाणं ऐकायचं आहे’’. त्यावेळी लालाजींनी केवळ आमच्या आप्पांसाठी बेगम अख्तर यांना बिदागी देऊन कार्यक्रमासाठी बोलावले होते. ‘धन्य धन्य ते शिष्य आणि धन्य धन्य ते गुरु.’  
आप्पांची शिष्य परंपराही खूप मोठी आहे. त्या पैकी धुळ्यातील कै. डॉ.श्रीपाद रामचंद्र नाईक या शिष्याने तर शास्त्रीबुवांच्या लौकीकात चांगलीच भर टाकली. शास्त्रीबुवांनी धुळ्यात लावलेल्या संगीत रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर केले. शास्त्रीबुवा धुळ्यात असतांना अनेक गायकांच्या संगीत मैफीली त्यांनी घडवून आणल्या. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर गायक आप्पांच्या चांगल्याच परिचयाचे असल्यामुळे ते विषेश बिदागीची अपेक्षा न ठेवता धुळ्यात कार्यक्रमासाठी केवळ शास्त्रीबुवांसाठी येत असत. सन 1950 साली फैयाजखाँ साहेब यांना देवाज्ञा झाली. त्यांचे स्मरणार्थ दरवर्षी धुळ्यात विविध कलाकारांना निमंत्रीत करुन खाँसाहेबांची पुण्यतिथी ते साजरी करीत असत. त्यात प्रामुख्याने पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, बालगंधर्व, मीना लागू, प्रभा अत्रे वगैरेंच्या संगीत मैफीली माझ्या चांगल्याच स्मरणात आहे. ही सर्व मंडळी या परिसरात कार्यक्रमास आली म्हणजे आवर्जून आप्पांच्या भेटीसाठी धुळ्यास येत असत. धुळ्यास नाटक कंपनीचा मुक्काम असतांना बालगंधर्व, दामुआण्णा मालवणकर, चित्तरंजन कोल्हटकर, शांता आपटे वगैरे अनेक कलाकार मंडळी आमच्या घरी येऊन गेल्याचे माझ्या स्मरणात आहे. तसेच पं. ओंकारनाथ ठाकूर, हिराबाई बडोदेकर या ही आमच्या घरी येऊन गेल्याचे मला आठवते. आप्पांचे दुसरे नामवंत विद्यार्थी म्हणजे पुण्यात संगीत क्षेत्रात बहुमान असलेले कै. दत्तोपंत देशपांडे. हे मूळ धुळ्याचेच. संगीत अध्ययन आप्पांकडे झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या लक्ष्मीरोड वरील घरात आप्पांचे वारंवार जाणे व्हायचे. आप्पा पुण्यात आल्यावर दत्तोपंत देशपांडे हे पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, हिराबाई बडोदेकर, वामनराव देशपांडे वगैरे मंडळींना रात्री आवर्जून बोलावून घेत आणि त्या सर्वांची ती रात्र गप्पागोष्टीत व गायन वादनात केंव्हा संपायची हे समजतही नसे. 
आमच्या आप्पांची संगीत क्षेत्रात योग्यता किती मोठी होती हे मला लहानपणी अनुभवायला आले. अंमळनेर येथे डॉ. म्हसकर यांच्याकडे पं. भीमसेनजी यांची मैफील होती. धुळ्याहून बरीच संगीत प्रेमीमंडळी अमळनेरला भीमसेनजींचे गाणे ऐकण्यासाठी गेली होती. आप्पांबरोबर मीही होते. पावसाचे दिवस असल्याने व वाहनात बिघाड झाल्याने त्या कार्यक्रमासाठी पंडीतजींना यायला उशीर झाला होता. रात्री 11 वाजता पंडीतजी व्यासपीठावर आल्यावर समोरील श्रोत्यांमध्ये पुढेच शास्त्रीबुवांना बसलेले पाहताच व्यासपीठावरुन ते खाली उतरले आणि दोन मिनीट आप्पांशी बोलून, हस्तांदोलन करुन, त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. मध्यंतरात सत्काराच्यावेळी पंडीतजी संयोजकांना म्हणाले माझ्या सत्काराच्या आधी तुम्ही आमच्या शास्त्रीबुवांचा सत्कार करा. आजचे सर्वच हार शास्त्रीबुवांनाच घाला. आप्पांनी फक्त एका हाराचाच स्वीकार करुन बाकी सर्व हार पंडीतजींना स्विकारण्यास विनंती केली. हा प्रसंग स्मरणात असलेली काही मंडळी धुळ्यात अजूनही आहेत. माझे मेव्हणे, संचालक - गोडसे व्हायोलिन विद्यालय पुणे, श्री मधुकरराव गोडसे यांनी पुणे ग्रंथालयाच्या सभागृहात आप्पांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हार्मोनियम साथीला मा. आप्पासाहेब जळगांवकर व तबला साथीला मा. चंद्रकांत कामत हे होते. पुण्यातील संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होती. आप्पांची ती मैफल माझ्या स्मरणात आहे. आप्पांच्या गळ्यात पंजाबी ढंग असणारा ठुमरीबाज चांगलाच होता. ठुमरी सादर करतांना ते मधुन-मधुन शेरशायरीही सादर करीत असत. ख्याल गायना बरोबर नाट्यगीते, भजनेही ते अप्रतीम सादर करीत असत. ‘दिलरुबा’ हे त्यांचे आवडते वाद्य होते. ते उत्तम दिलरुबा व व्हायोलिन वाजवत. 
उतार वयात शास्त्रीबुवांनी धुळे सोडले आणि ते आपल्या मूळगावी नंदुरबारला आले. आपल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या माडीवर त्यांनी सुरसिंगार संगीत विद्यालय सुरु केले. आज नंदुरबार जिल्हाचे ठिकाण झाले आहे. पूर्वी आदिवासी तालुका म्हणून प्रसिध्द होता. अशा भागात संगीताचे बीजारोपण करुन लोकांमध्ये संगीताची आभिरुची निर्माण व्हावी म्हणून लहान थोर गायकांचे अनेक कार्यक्रम त्यांनी घडवून  आणलेत. शास्त्रीबुवांचे संगीतातील हे कार्य नंदुरबारकर व धुळेकर कधीही विसरणार नाहीत. 
गायनाचार्य कै.पं. श्रीपतशास्त्री यांची संगीत परंपरा : --- शास्त्रीबुवांना चार मुलं व दोन मुली असा त्यांचा परिवार. परंतू त्यांची संगीत परंपरा मात्र त्यांच्या दोन्ही मुलींनी आजपर्यंत टिकवून ठेवली आहे व भविष्यातही ती संगीत परंपरा चालू राहील अशी खात्री आहे. 
शास्त्रीबुवांचा संगीत परिवार - पुण्यातील संगीत क्षेत्रातील ख्यातनाम गोडसे वाद्यवादन विद्यालयाचे संचालक कै. श्री मधुकरराव गोडसे (जेष्ठ जावई), श्रीमती रंजना गोडसे (जेष्ठ कन्या), श्री आनंद गोडसे (नातू), सौ क्षमा गोडसे (नातसून), सौ. मंगला गोडसे - पंडीत (नात ) ही सर्वच मंडळी पुण्याच्या संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असून संगीताचा प्रसार व प्रचार करीत आहे. गोडसे वाद्यवादन विद्यालयास आज 55 वर्षे पूर्ण झालीत. त्या विद्यालयातून शेकडोंनी विद्यार्थी संगीत विशारद आणि अनेक विद्यार्थी संगीत अलंकार झाले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी नामवंत गायक / वादक म्हणून संगीत क्षेत्रात नावलौकीक मिळवीत आहेत. अनेक विद्यार्थी परदेशातही कार्यरत आहेत.  तसेच नंदुरबार येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे संचालक श्री गोविंद बुवा रोकडे (कनिष्ठ जावई), सौ नलिनी रोकडे (कनिष्ठ कन्या), श्री सारंग बुवा रोकडे (नातू), सौ दीपाली रोकडे (नातसून), सौ धनाश्री रोकडे - गांडेकर (नात) ही सर्वच मंडळी नंदुरबार येथील सुरसिंगार संगीत विद्यालयात कार्यरत आहे. सौ धनश्री रोकडे - गांडेकर हीने तर पुणे व नंतर काठमांडू (नेपाळ), टोंगा (न्यूझिलँड) येथे संगीताचे वर्ग चालवले होते. हल्ली ती कलकत्ता येथे कार्यरत आहे. 
सुरसिंगार संगीत विद्यालयास आज 40 वर्षे पूर्ण झाली असून या विद्यालयातूनही शेकडो विद्यार्थी संगीत विशारद व काही विद्यार्थी संगीत अलंकार झाले आहेत. या विद्यालयाची विद्यार्थीनी कु. सविता साक्रीकर ही 12वी (एच.एस.सी.) ला संगीत विषयात बोर्डात पहिली आली आहे. तसेच रश्मीकांत त्रिवेदी हा विद्यार्थी तर दोन वर्षापूर्वी गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत विशारद ह्या परिक्षेत महाराष्ट्रात पहिला तर भारतात दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच या विद्यालयातून संगीत विशारद झालेला सचिन चंद्रात्रे हा पुढे अलंकार होऊन नामवंत गायक म्हणून प्रसिध्द होत आहे. नुकताच तो पाकिस्तानातील सार्क संगीत परिषदेत गाऊन आला आहे. सुरसिंगारचे अनेक विद्यार्थी संगीत शिक्षक म्हणून आज कार्यरत आहेत. 
आमच्या या सुयशाचे श्रेय आम्ही आमचे पिताश्री गायनाचार्य कै. श्रीपत शास्त्री व आमचे गुरु कै. डॉ. बाळासाहेब नाईकसर यांनाच देत आहोत. यांनी आम्हाला घडवले नसते तर आज आम्ही दोघी भगिनी संगीत क्षेत्रात हे भरीव कार्य करु शकलोच नसतो. आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. शास्त्रीबुवांच्या वरील तीन पिढ्या संगीताचा प्रसार व प्रचार करीत आहेतच पण आता चौथी पिढी म्हणजे माझी नातवंडही संगीताचे अध्ययन करीत आहेत. नंदुरबार मध्ये शास्त्रीबुवांचे नाव कायम रहावे म्हणून आम्ही आमच्या संगीत विद्यालयाच्या बोर्डवर व रेकार्डवर कै. गायनाचार्य श्रीपत शास्त्री यांचे -- सुरसिंगार संगीत विद्यालय असे कायम स्वरुपी लिहिले आहे. 
मृत्यु समयीचा योगायोग - नंदुरबार मधील संगीत प्रेमी ख्यातनाम डॉक्टर वडाळकर यांचा आप्पांवर फार लोभ होता. आप्पा अत्यवस्थ झाल्यावर आम्ही डॉक्टरांना बोलावले. त्यांना तपासल्यावर ते म्हणाले  आप्पा आता काही वेळाचेच सोबती आहेत. औषधोपचारापेक्षा तुम्ही त्यांना संगीतच ऐकवा. हे ऐकून आम्ही सर्वजण हादरलोच. हाताशी लागेल ती ऑडिओ कॅसेट आम्ही टेपला अडकवली. टेपमधुन आवाज आला तो बेगम परवीन सुलताना यांचा. ‘भवानी दयानी’ ही भैरवी त्या आळवीत होत्या. भैरवीचे सुर ऐकता ऐकता आप्पांनी आयुष्याची भैरवी संपविली. 2 नोव्हेंबर 1976 रोजी त्यांचा संगीत आत्मा अनंतात विलीन झाला. संगीत कार्य या पुढेही अखंड चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली होणार आहे. 
गुरुवर्य गायनाचार्य पं. श्रीपत बाळकृष्ण शास्त्री. जन्म दि :- 02/10/1902, मृत्यु दि. 08/11/1976 , संस्थापक : - सुरसिंगार संगीत विद्यालय, बालाजी वाडा, नंदुरबार.

सौ. नलिनी रोकडे (संगीत अलंकार)
संचालिका- सुरसिंगार संगीत विद्यालय, 
बालाजी वाडा, नंदुरबार. मो. 8087511682




Post a Comment

0 Comments