नरडाणा-- नरडाणा पोलीसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर एका हॉटेलजवळून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. वाहनाची मालकीहक्क दर्शविणारी सबळ कागदपत्रे सादर न केल्यामुळे तीन संशयितांना जेरबंद केले.
मुंबई-आग्रा महामार्गावर एका हॉटेलजवळ तीन दुचाकीस्वार संशयास्पद उभे असल्याची गुप्त माहिती रविवारी नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता हर्षवर्धन सतीश निकम (रा. सातपूर एमएचबी कॉलनी, बिल्डिंग क्रमांक २, रूम नं. ४८ ह.मु. मोरवाडी, सेंट लॉरेन्स शाळेमागे, पाथर्डी फाटा, सिडको, नाशिक), सूरज कृष्णा मैराळे (रा. बोरविहीर, ता.जि. धुळे, ह.मु. विष्णूनगर, देवपूर, धुळे) व एकाने भावेश सुभाष ढमढेरे (विष्णूनगर, देवपूर, धुळे) असे नाव सांगितले.
तिघांना दुचाकींची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र त्यांनी मालकीहक्काबाबत कुठल्याही सबळ पुराव्याची कागदपत्रे सादर केली नाहीत. पैकी एक दुचाकी नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. अन्य दोन दुचाकीही संशयास्पद असल्याने तिघांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाकरे यांच्या सूचनेनुसार संदीप काळे, श्री. माळी, श्री. खेडवन, सचिन वाघ, मुकेश अहिरे, अर्पण मोरे, दीपक भामरे, रवींद्र महाले, होमगार्ड जितेंद्र रणदिवे यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली.

0 Comments