Header Ads Widget

भीषण अपघात : कंटेनर मोटारसायकलवर धडकल्याने मामा-भाचा ठार


शिंदखेडा तालुक्यातील बाभळे शिवारात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात मामा आणि भाचा यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव कंटेनरने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने हा अपघात घडला.

घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पिंप्राळा (ता. शिंदखेडा) येथे राहणारे सुनिल साहेबराव बेहरे ( ३५) हे आपला भाचा चेतन पंकज देसले ( २१) याच्यासोबत नेहमीप्रमाणे दुचाकीने (एमएच १८ बीडब्ल्यु २४२०) औद्योगिक वसाहतीत कामावर जात होते. बाभळे फाट्याजवळ मागाहून आलेल्या भरधाव कंटेनरने (डीएन ०१ आर २८६७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर रस्त्यावरील प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ पोलीस मदत केंद्राला माहिती दिली. त्यानंतर शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर कंटेनर चालक चंद्रभान सीतलाप्रसाद प्रजापती ( ३२, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. चेंबूर, मुंबई) हा स्वतःहून शिंदखेडा पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी पंकज जगन्नाथ देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत.

या अपघातामुळे परिसरात रस्ता सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाभळे फाटा आणि परिसरातील रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून वेगमर्यादा, सूचक फलक तसेच गतिरोधकांची कमतरता असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत कामगार, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची संख्या जास्त असताना अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अपघातांचा धोका वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी रस्त्यावरील वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणणे, अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक व गतिरोधक उभारणे, तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments