मिनी मंत्रालयात अर्थात जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा नव्या वर्षात उडणार आहे. राज्यातील प्रलंबित ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहे.
आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आयोगातील आधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका २१ दिवसात होणार आहेत. त्याबाबतची आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीत १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचं बिगुल वाजणार आहे. ८ जानेवारीच्या आधी जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता लागू शकते, असे आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेय.
दोन टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका?
सर्वोच्च न्यायालयान राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंतची वेळ दिलेली आहे. पण या कालावधीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता कमीच दिसतेय. २० जिल्हा परिषदेत आणि २११ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या निवडणुकांना आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जानेवारीत होऊ शकते. त्याबाबतची आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे.
कोणत्या जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार ?
३२ पैकी १२ जिल्हा परिषदेत ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादेचे पालन करण्यात आलेय. त्या झेडपीची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. २१ दिवसांत निवडणूक कार्यक्रम पूर्ण कऱण्याचा आयोगाचा प्लान आहे. सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील,असे आयोगाकडून सांगण्यात आलेय. ६ ते ८ जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतरच होतील, असे समोर आलेय.
१२ जिल्हा परिषदेचा संभाव्य कार्यक्रम
निवडणुकीची घोषणा - ६ ते ८ जानेवारी
उमेदवारी अर्ज भरणे - १० ते १७ जानेवारी
अर्जांची छाननी अन् माघार - १८ ते २० जानेवारी
चिन्ह वाटप - २१ जानेवारी
मतदान - ३० जानेवारी
मतमोजणी - ३१ जानेवारी
0 Comments