धुळे--- दि. २३ डिसेंबर २०२५: साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक मा. श्री. हेरंब कुलकर्णी यांनी धुळे जिल्ह्यातील एकल महिलांच्या सर्वेक्षणासंदर्भात मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. महिला व बालकल्याण विभाग प्रमुख तसेच मा. शिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चा साधली. या चर्चेनंतर ग्रामीण व शहरी भागातील विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिलांसाठी बालसंगोपन योजना, उमेद योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वेक्षण कार्य राबवण्याचा निर्णय झाला.साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्यातील ८० तालुक्यांत एकल महिलांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. समितीचे कार्यकर्ते या महिलांना विविध पातळ्यांवर सहाय्य पुरवितात. राज्यात विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिलांची संख्या ८० लाखांपेक्षा अधिक असून, त्यांच्या समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. विविध विभागांच्या योजना एकत्रितपणे राबवल्यास या महिलांच्या समस्या सोडवता येतील, अशी माहिती मा. श्री. कुलकर्णी यांनी दिली.या महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल. धुळे जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक श्री. ईश्वर पाटील, तालुका समन्वयक श्री. पियुष शिंदे, श्री. दत्तू पाटील, श्री. भारतीय अहिरे, सौ. योगिता येवले, सौ. धनश्री भावसार व सौ. सुनिता देसले यांसारख्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.
0 Comments