अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात गणित जत्रा चे आयोजन केले होते. दिवसभर कार्यक्रमाची रेलचल बघायला मिळाली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आनंददायी पद्धतीने अध्ययन व अध्यापन करून घेतले.
गणित दिवसाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून गणित विषयाचा मार्गदर्शन वर्ग आयोजित केला होता. त्यासाठी चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र भावे सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर विद्यार्थ्यांना होणाऱ्या चुका, घेण्यात येणाऱ्या दक्षता याविषयी गणित विषयाचे सखोल मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात प्रत्यक्ष मैदानावर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, उद्घाटक विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र भावे, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक विलास चौधरी व गणित शिक्षक डी. ए. धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गणित शिक्षक हर्षल पवार, निकिता पाटील, यशोदीप बागल उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भावे सरांनी सांगितले की, गणित हा सरावाचा विषय आहे त्यामुळे सरावच तुम्हाला पुढे नेऊ शकतो. मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतीही संकल्पना समजण्यासाठी ती मैदानावर दाखवली तर अधिक प्रभावी होऊ शकते. त्यातून गणिताचे चांगले अध्ययन घडून येते व त्याचे परिणाम देखील चांगले असतात. यातूनच प्रतिभावान गणित तज्ञ तयार होऊ शकतात. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संदीप घोरपडे यांनी सांगितले की, महान गणित तज्ञ रामानुजन यांचे गणिताविषयीचे समर्पण कधीही विसरता येणार नाही. त्यांची गणितातील तपश्चर्या आश्चर्यकारक आहे.
सर्व शिक्षक व विद्यार्थी मिळून मैदानावर भौमितिक आकृत्या काढल्या होत्या. त्यामुळे मैदानाची सुंदरता आधी खुलून दिसत होती. तसेच विद्यार्थ्यांना आकृती समजून घेण्यात मदत होत होती. याच वेळेस गणित विषयाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले वर्किंग मॉडेल ठेवले होते. प्रत्येक विद्यार्थी आपण बनवलेले मॉडेल व त्यातील गणिती कार्यकारण भाव तळमळीने समजावून सांगत होते. विद्यार्थ्यांनी विविध गणितातील विषयांवर आपले सादरीकरण केले. सदर प्रदर्शनाचा लाभ साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व साने गुरुजी कन्या हायस्कूल मधील सर्व विद्यार्थिनींनी घेतला. प्रत्येक विद्यार्थी आपल्या मित्राने वैज्ञानिक दृष्टिकोनातून कौशल्य पूर्णपणे बनवलेले साहित्य कुतूहलाने बघत होते. संस्था सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने व गणित शिक्षक डी. ए. धनगर यांच्या संकल्पनेने मैदानावर रांगोळी वापरून विविध भौमितिक आकार काढण्यासाठी विद्यालयातील निकिता पाटील, हर्षल पवार, यशोदीप बागल, वैशाली पाटील, जयेश मासरे, किरण सोनार, संदीप निकुंभ, शुभम निकम व राजश्री महाजन यांनी परिश्रम घेतले. अत्यंत सुबक पद्धतीने रांगोळीचा वापर करून भौमितिक आकार काढून त्याखाली प्रत्येक भौमितिक आकृती चे नामोल्लेख केलेला होता. सदर दिवसभर चाललेल्या उपक्रमाचे कौतुक संस्था अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, कार्यक्रमाचे उद्घाटक नरेंद्र भावे, मुख्याध्यापक सुनील पाटील, सर्व संचालक मंडळ, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी केले.
0 Comments