"फुलती कविता,
उमलते शब्द!"
पीके पहाता करपलेली,होते कितीक मग यातना,
असतो काहो दुष्काळ सोपा,येतो का दुनयेला सांगता!
काय असते जनावरांचे,रित्या पोटाने ते हंबरणे,
जमते का मग वेदनांचे,सांगा सर्व कांही ते मांडणे,
भाग्य निसटता हतातले,येते का दुसऱ्याला मागता,
असतो काहो दुष्काळ सोपा, येतो का दुनयेला सांगता!
मातीमध्ये गाडलेले मग, सर्वस्व जेंव्हा हो उमलते,
घाम प्याले रानं खुशीमधे, जेंव्हा आनंदाने हो डौलते,
त्याच वेळेला ऋतु कोपती,घेती काढूनी घास हातचा,
असतो काहो दुष्काळ सोपा,येतो का दुनयेला सांगता!
भंगती जेंव्हा स्वप्ने रुपेरी, असती मनामध्ये जपली,
भळभळतेच जखम ती,ज्या वरची निघते खपली,
भविष्य नाचे फेर धरुनी,मग नाही संपतं यातना,
असतो काहो दुष्काळ सोपा, येतो का दुनयेला सांगता!
अनुदान दिल्याने का संपे, दुष्काळ नशीबास जो आला,
ओंजळभर पाण्याने कसा,सांगा होईल शिवारं ओला,
सांगा कशाने जुळलेलं मग,विश्व कुणब्याचे ते भंगता,
असतो काहो दुष्काळ सोपा, येतो का दुनयेला सांगता!
जेंव्हा करपते जीवापाड,जपलेले मायेने ते रानं,
मग जनावरा चारापाणी,अन् पोटाला देईलं कोणं,
विस्कटलेली घडी जुळण्या, जाती वर्ष किती न ठाऊका,
असतो काहो दुष्काळ सोपा, येतो का दुनयेला सांगता!
आला बळीच्या नशीबी ऐसा, दुष्काळ पेटवीत रानं,
जळुन गेले पीक ऊन्हाने,त्याचे डोळे पुशीलं हो कोणं?
कसा सावरीलं प्रपंचाला,मरण आपुलेच पहता,
असतो काहो दुष्काळ सोपा,येतो का दुनयेला सांगता!
© अनिल गव्हाणे
बापु, शेती मातीचे कवी.
संपर्क:९६०४६१९४६२.
0 Comments