धुळे -- समाजात जन्मलेली काही माणसं थोर भारतीय परंपरेतील महर्षी दधतीची यांचा वारसा जपत जगणारे असतात. नावात राजा असूनही फकिराचे आयुष्य जगणार्या आणि शेवटच्या श्वासनापर्यंत समाजासाठी लढत ‘राम‘ देणार्या स्व.राजाराम पाटील यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आणि आदर्श घेणारा असाच आहे. राजाराम पाटील यांची एक्झीट मराठा समाजाला,मराठी मनाला धुळ्यातील सामाजीक,राजकीय,सांस्कृतीक क्षेत्रात काम करणार्या तमाम संवेदनशिल सहह्रदयी माणसांना चटका लावणारी आहे.
सामाजीक,राजकीय, कला प्रांतात काम करणार्या चळवळीतील कार्यकर्त्याला राजाराम पाटील नाव माहित नसणे हे अशक्यच आहे. राजाराम भाऊंच्या स्नेहाची,मार्गदर्शनाची,आधारांच्या दोन शब्दांची उब आम्हाला मिळाली. त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवानच समजतो. आमच्या कुटूबियांचे राजाराम भाऊ यांच्या परिवाराशी जवळचे संबंध होते. मिल परिसर या कामगारांच्या वसाहतीत राहणार्या स्वर्गीय राजाराम भाऊ यांचा जीवनप्रवास चळवळीत काम करणार्या, संघर्षातून जीवनाला आकार देणार्या,आयुष्य घडविणार्या सार्यांसाठीच प्रेरदायी असा आहे. संगमनेर येथून आलेले राजाराम वालजी पाटील यांचे कुटूंबिय मिल परिसरात स्थायिक झाले. गौरी वनसपतींमध्ये राजाराम पाटील यांचे बंधू कौतीक पाटील,नामदेव पाटील यांच्या सोबत आमचे पिताश्री श्री.धर्माभाऊ पवार यांचे प्रेमाचे संबंध दृढ झाले. कौटूंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.वकृत्व गुण यामुळे राजाराम भाऊंनी मोठमोठ्या सभा गाजविल्या. स्वतःची तरुणसेना उभी करुन तरुणांचा मोठा गोतावळा निर्माण करण्याची धमक त्यांनी दाखविली. तरुण सेनेच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देण्याचे त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम भाऊंनी केले. कुटूंबाचा चरित्रार्थ चालविण्यासाठी नाट्यसुवर्ण संस्थेच्या माध्यमातून हिरे भवनला अनेक अजरामर नाटके आणली. त्यांच्यामुळेच धुळ्यातील कलाप्रेमी नागरीकांना, दर्दी रसिकांना रंगभुमीवरील महाकलावतांना सहदेह डोळ्यात सामावता आले. राजाराम भाऊ यांच्या नावापुढे नाट्यसुवर्ण ही पदवी जनतेनेच बहाल करत लावली. राजकारणात प्रवेश करतानाच आपल्या नेत्यांसाठी जीवाचे राण करणारा,विरोधकांना रोखठोक भाषेत सुनावत त्यांना अंगावर घेणारा हा अवलीया एक अजब रसायन होते. राजकारणात गेल्यानंतर अनेकांना अवघ्या वर्ष दोन वर्षात लक्ष्मी प्रसन्न होते. ऐनकेन मार्गाने भल्या बुर्यांची सोबत करत एक, दोन, आणखी कितीतरी नंबरच्या धंद्यातून माया कमविणारे महाभाग धुळ्यात कमी नाहीत. परंतु नावात राजा असूनही स्वर्गीय राजाराम भाऊ हे अशा मार्गापासून अलीप्तच राहिले. असे गैर प्रकार त्यांना त्यांच्या स्वभावामुळेच रुचणारेच नव्हते. म्हणूनच की काय भाऊंचे स्वतःचे हक्काचे घरही ते घेवू शकले नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून स्व.भाऊंनी स्वतःला राजकारणाच्या या चिखलापासून लांबच ठेवले. सामाजीक, चळवळीतला त्यांचा सहभाग मात्र या राजा माणसाचा राम देईपर्यंत कायम राहिला. मराठा क्रांती मोर्चा आणि त्या माध्यमातून झालेल्या आंदोलन उपोषणामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी वेळोवेळी संबंधितांना मार्गदर्शनही केले. जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मनोज जलांदे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. त्यातच आंदोलन करणार्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने राज्यातून संपूर्ण मराठा समाजाच्या भावना तिव्र झाल्या. धुळ्यासह जिल्ह्यातील मराठा आंदोलक बांधवांनी ठिकठिकाणी मोर्चे,आंदोलने उपोषण करुन जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाला साथ दिली. गेल्या काही दिवसांपासून धुळ्यातही मराठा बांधवांनी साखळी आंदोलन सुरु केले आहे. काल आपल्या समाजासाठी हा मर्द मराठा गडी आंदोलनात पोहचला. जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली. उपस्थितांना मार्गदर्शनही केले. त्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घरी आल्यानंतर आणखीनच त्रास वाढला. रुग्णालयात जाण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालावली. शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी झटणार्या, लढणार्या स्व.राजाराम भाऊ पाटील आमची साश्रु नयनांनी शब्द सुमनांजली.
-देवा पवार (संपादक,वृत्तपत्र खटाटोप)
मो.9405806617
0 Comments