Header Ads Widget

शिंदखेड्यातील भाजी मंडईचा प्रश्न सुटेना; एक दिवस दुकाने थाटून विक्रेत्यांनी मंडईकडे फिरविली पाठ



शिंदखेडा--: नवीन भाजीपाला मार्केटमध्ये फक्त एक दिवस आपले दुकाने थाटून येथील विक्रेत्यांनी या मंडईकडे पाठ फिरविली असून, शहराचा भाजीपाला मार्केटचा प्रश्न कधी सुटेल, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

येथील भाजी मार्केटचा प्रश्न सुटावा म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ६३ लाख रुपयांच्या खर्चातून येथे भाजी व फळ विक्रेत्यांसाठी ओटे व शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम करण्यात आले. 

तीन वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या या ओटे व शॉपिंग गाळ्यांचा लिलाव गेल्या जुलैमध्ये करण्यात आला. त्या माध्यमातून एक कोटीवर उत्पन्न नगरपंचायतीला मिळाले.

नगरपंचायतीतर्फे २४ जानेवारीला संबंधित ओटेधारक व गाळेधारकांनी २५ जानेवारीपासून आपल्या जागेत दुकान थाटून व्यवसाय करावा, अशी नोटीस देण्यात आली.

मंडईत अनेक समस्या असल्याने भाजी विक्रेत्यांनी तिकडे पाठ फिरविली आहे. काही विक्रेत्यांनी मंडईमध्ये दुकाने लावून पाहिली, मात्र भांडवल हजारो रुपयांचे आणि दिवसभराची कमाई ही फक्त शंभर ते दोनशे रुपये.

या मंडईत भाजी खरेदीसाठी गिऱ्हाईकेदेखील येत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकाने स्टेशन रोडच्या दुतर्फा थाटली आहेत. ग्राहक येत नसल्याने फक्त एकच दिवस भाजी विक्रेत्यांनी तेथे दुकान थाटून व्यवसाय होत नसल्याच्या कारणाने या भाजी मंडईकडे विक्रेत्यांनी पाठ फिरविली.

सोमवारी (ता. २९) शिंदखेडा शहराचा बाजार असून, सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी स्टेशन रोडच्या दुतर्फा आपली दुकाने थाटली होती. सुखसुविधा व सर्व विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे व्यवसाय होऊ शकतो, असे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

ज्यांना ओटे मिळाले नाहीत ते रस्त्यावर दुकाने थाटत असतील तर आमचा व्यवसाय कसा होईल, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

शासनाचा खर्च वाया

गेल्या ४० वर्षांपासून शिंदखेडा शहरातील माजी मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. तत्कालीन आमदार ठाणसिंग जिभाऊ यांनी शिंदखेडा शहराचा भाजी मंडईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून नगरपंचायत चौकात जयप्रकाश भाजी मंडई बांधण्यात आली.

मात्र तेथे व्यवसाय होत नाही म्हणून मंडईत एक दिवसही भाजी बाजार भरला नाही. शासनाचा लाखो रुपये खर्च वाया गेला. ती स्थिती या नुकतीच बांधण्यात आलेल्या भाजी मंडईची होऊ नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments