शिंदखेडा--: जखाणे (ता. शिंदखेडा) येथील १७ वर्षे नऊ महिने वय असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा गावातील महाविद्यालयीन तरुणाने मैत्री करून बसमध्ये अश्लील कृत्य केल्याने सोमवारी (ता.
२९) दुपारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात 'पॉक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीने शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
की ऑक्टोबर २०२२ मध्ये एके दिवशी महाविद्यालयात जात असताना वैभव रवींद्र बेहरे (रा. जखाणे, ता. शिंदखेडा) याने बसमध्ये गळ्यात हात टाकून मोबाईलमध्ये छायाचित्र काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली.
नकार दिला असता त्याने शिवीगाळ केली व लज्जास्पद कृत्य करीत ठार करण्याची धमकी दिली. वैभवच्या त्रासाला कंटाळल्याने शेतातील पिकांवर फवारणीकरिता आणलेले औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
परंतु वेळीच दवाखान्यात नेल्याने जीव वाचला. वार्षिक परीक्षा असताना पुन्हा महाविद्यालयात गेली असताना वैभवने शरीरसंबंधाची मागणी केली.
त्यास नकार दिल्याने त्याने डोके भिंतीवर ठोकून ठार करण्याची धमकी दिली. तरुणीच्या वडिलांनी आतेभाऊशी २५ मार्च २०२४ लग्न ठरविले होते.
वैभवने होणाऱ्या पतीस भेटून मोबाईलमधील छायाचित्र दाखवून प्रेमसंबंध व आम्ही लग्न करणार असल्याचे सांगत त्यालाही ठार करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ठरलेले लग्नदेखील तुटले आहे.
तरुणीने शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, वैभवविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश सूर्यवंशी तपास करीत आहेत.
0 Comments