Header Ads Widget

होळनांथे येथील हवामान केंद्रातून ट्रिगरची चोरी



शिरपूर: होळनांथे (ता. शिरपूर) येथील स्वयंचलित हवामान केंद्रातील डेटा लॉगर प्रणाली व सौरऊर्जा पॅनलची ऑगस्टमध्ये चोरी झाली. सलग दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार घडला. मात्र अद्यापही कृषी विभागाने त्याबाबत पोलिसांत तक्रार दिलेली नाही.

दरम्यान, हवामानाच्या नोंदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे विम्याचे नुकसान होण्याची दाट शक्यता असून, याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार काशीराम पावरा यांनी दिले.

होळनांथे महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र आहे. तेथे डेटा लॉगर प्रणालीद्वारे वातावरणातील बदलांची नोंद केली जाते. या प्रणालीसह तेथील सौरऊर्जा पॅनलही ऑगस्टमध्ये चोरीस गेले.

या यंत्रणेची तांत्रिक जबाबदारी असलेल्या स्कायमेट व्हेदर सर्व्हिसेस प्रा.लि.चे विनायक पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे यांना १३ ऑगस्टला पत्र देऊन चोरीची माहिती दिली. त्यानंतर सहा महिने उलटूनही कृषी विभाग किंवा स्कायमेट व्हेदर यापैकी कोणीही चोरीबाबत पोलिसांत फिर्याद नोंदविलेली नाही.

नुकसानीची शक्यता

हवामान केंद्राची सध्याची जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. सध्या केंद्राच्या तारकंपाउंडमध्येच नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तेथील संवेदकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या जागेची परिस्थिती पाहता यंत्रणेचे स्थान बदलल्यामुळे ही जागा हवामान केंद्रासाठी अयोग्य ठरण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर होळनांथे महसूल मंडळातील हवामान केंद्र तात्पुरते स्थगित केल्याचे पत्र देऊन पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही कार्यवाही न झाल्यामुळे स्थानिक शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

असा आहे निर्णय

शासनाने नेमून दिलेल्या निकषाप्रमाणे, पिकासाठी १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सलग तीन दिवस किमान तापमान आठ अंश किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास ट्रिगर (प्रमाणक)नुसार प्रतिहेक्टर २६ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई दिली जाते.

विमा कंपनी जो लाभ देते तो केवळ ट्रिगरच्या नोंदीवरून देते. ऊन, वारा, पाऊस, थंडीच्या सर्व नोंदी ट्रिगरमध्ये असतात. शासन निर्णयानुसार २० हेक्टर क्षेत्रासाठी प्रत्येक महसूल सर्कलला ट्रिगर असणे आवश्यक आहे.

"सतत सहा महिने ट्रिगर बंद राहणे धक्कादायक आहे. त्याची चोरी झाल्याची फिर्याद का दिली नाही याचा खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. होळनांथे ट्रिगरच्या नोंदी बंद असल्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी शेजारच्या महसूल मंडळातील नोंदी वापरल्या जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तो शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत." -आमदार काशीराम पावरा

"पीकविम्याचा लाभ मिळेल किंवा नाही हे सर्वार्थाने ट्रिगरच्या नोंदीवर अवलंबून आहे. आधीच विमा कंपन्या विम्याचा परतावा देण्याबाबत फारशा उत्सुक नसल्याचा अनुभव आहे. त्यात ट्रिगर नोंदीसारखी तांत्रिक कारणे पुढे आल्यास विमा नाकारण्यासाठी आयतेच कारण मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे." -के. डी. पाटील, सभापती, बाजार समिती

Post a Comment

0 Comments