*धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका हा अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरला आहे. ज्यामध्ये आमदार अमरिश पटेल यांच्या सिंचनाच्या ‘पॅटर्न’ मुळे राज्यभर शिरपूर नगरीचे नाव पोहचले. स्वातंत्र्य चळवळीतील या नगरीचे नाव आता विकसीत शहर म्हणून ओळखले जावू लागले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणूकीचे निकाला शिरपूर शहराचे नवनिर्वाचित आमदार काशिराम पावरा यांना राज्यात सर्वाधिक मते मिळाल्याने शिरपूर शहर पुन्हा राजकीय चर्चेत आले आहे.*
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका विविध कारणांनी गाजत आहेत. ईव्हीएम घोटाळा हे याचे प्रमुख कारण आहे तसा विरोधी पक्षांचा आरोप आणि दावा आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही मतदार संघाच्या निवडणूका वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहेत. धुळे शहर मतदार संघात एक लाखापेक्षा जास्त मते घेवून अनुप अग्रवाल यांनी मागील 75 वर्षाचे रेकॉर्ड मोडले आहे. गेल्या 13 विधानसभेच्या निवडणूकीत ऐव्हढे मतदान आजपर्यंत कुणालाही मिळालेले नाही. त्यातही मला मुस्लिम बांधवांचे एकही मत नको असे सांगून निवडणूक लढविणारे अनुप अग्रवाल हे एकमेव ‘धर्मयोद्धा’ असावेत. तर धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांचा पराभाव अवघ्या 32 वर्षाच्या तरूणाने किमान 65 हजार मते जास्त घेवून केला, त्यामुळे राम भदाणे या तरूणाच्या विजयाने जी चर्चा सुरू आहे ती थांबयला तयार नाही. साक्री मतदार संघातील शिंदेसेनेच्या महिला आमदार मंजूळाताई गावित यांनी सर्व राजकीय नेते विरोधात असतांना अभूतपूर्व विजय मिळवत आपली आमदारकी कायम ठेवली आहे. त्यामुळे या तालुक्यातील काँग्रेस पक्षातील गटबाजीने आणि भाजपातील दुफळीने तालुक्याचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. तर शिंदखेडा येथील निवडणूक ही जयकुमार रावलांनी ‘अभिमन्यूसारखी’ सर्व योद्धांना लोळवत प्रचंड मतांनी जिंकली आहे. तर शिरपूर मतदार संघाची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी होती, परंतू विनाकारण राजकारणाची हौस म्हणून डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढविल्याने त्यांचे ‘हंगामी राजकारण’ चर्चेत आले आहे. शिरपूर तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे. गान कोकीळा स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आजोळ (थाळनेर) असलेला हा तालुका आहे. तर स्वतंत्रता सेनानी स्व. व्यंकटराव अण्णा रणधीर, स्व. शिवाजीराव दादा पाटील, स्व. रामसिंग राजपूत यांचेसारख्या स्वतंत्रता सेनानींमुळे स्वातंत्रय आंदोलनाच्या पानावर शिरपूरचे नाव अंकित आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता पाटील यांनी देखील शिरपूरचे नाव सिनेसृष्टीसह देशभर गाजविले. थाळनेरचा किल्ला, अहिल्यापूरची अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक विहिर, प्राचिन नागेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, जागतिक स्तरावरची गोल्ड रिफायनरी आणि आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्याचा ‘सिंचनाचा पॅटर्न’ यामुळे शिरपूरचे नाव राज्यात अभिमानाने ओळखले जाते. याशिवाय शिरपूर नगरीत उभ्या झालेल्या उच्च शिक्षणाच्या विविध संस्था आणि त्यामुळे निर्माण झालेले जिल्ह्यातील शैक्षणिक हब, तालुक्यातील रस्ते, आरोग्य सेवा, गावा-गावात निर्माण झालेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, अद्ययावर शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या मुलभूत सुविधा यामुळे तालुक्यातील मतदार, ग्रामस्थ हे आमदार अमरिश पटेल यांच्या नेतृत्वावर समाधानी आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आमदार पटेल कुटूंबियांचा जनसंपर्क, जनसंवाद हा वर्षभर सातत्याने तालुक्यातील ग्रामस्थांशी, शिरपूर शहर वासियांशी असल्याने आमदार आम्हाला दिसलाच नाही, आमदार आमच्या गावाला आलेच नाहीत अशा प्रकारची तक्रारच शिरपूर मतदार संघात नाही. शेतकर्यांच्या अडचणी असोत, आदिवासी बांधवांच्या समस्या असोत त्या ताबडतोबीने सोडविल्या जातात. त्यामुळे शिरपूर तालुक्यातील मतदार समाधानी आहेत. याशिवाय आदीवास कुटूंबांसाठी, दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी, दारिद्र रेषेखालील कुटूंबांसाठी नेहमी आपल्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून शिबीरांचे आयोजन करून वेगवेगळ्या स्वरूपात मदत दिली जाते. आमदार काशिराम पावरा, आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, युवानेते चिंतनभाई पटेल हे सातत्याने तालुक्यातील नागरीकांना सहज भेटत असतात. शासकीय योजनांचा लाभ आपल्या तालुक्यातील नागरीकांना, शेतकर्यांना, आदिवासींना मिळवून देण्यासाठी आमदार पटेल यांचे पदाधिकारी नेहमी तत्पर असतात. त्यामुळे नाराजी हा विषय सहसा कुठेही येत नाही. राहिला प्रश्न रोजगाराचा तर त्या दृष्टीने विविध संस्थांची उभारणी करून तरूणांना रोजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. त्यामुळे आमदार अमरिशभाई पटेल हे भाजपात आहेत की काँग्रेस पक्षात आहेत याचा कोणताही परिणाम मतदारांवर होत नाही. आमदार पटेल कुटूंबाने आपला अपक्ष उमेदवार जरी उभा केला तरी तो निवडून येईल, याचे महत्वाचे कारण म्हणजे जनसंपर्क आणि जनसंवाद हे आहेत. आता डॉ. जितेंद्र ठाकूर ही चांगली व्यक्ती आहे. ते प्रामाणिक आहेत, विनम्र आहेत परंतू ते शिरपूर मतदार संघात ‘हंगामी’ राजकारणासाठी दाखल होतात. निवडणूका संपल्या की त्यांचा मतदारांशी काही संबंध नसतो. शिवाय ते 365 दिवसांपैकी 300 दिवस धुळे शहरात राहतात. मग ग्रामस्थांचे प्रश्न, रोजगारीचा प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न सोडविणार कोण ? आज नागरीक खुप हुशार झाले आहेत. मतदान करण्यापूर्वी आपल्याला आवाज दिला तर कोण मदतीला धावून येईल असा विचार करून ते मतदान करत असतात. याशिवाय शरदचंद्र पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही तेव्हाच डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढविण्याचा विचार सोडून द्यायला हवा होता आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुद्धा राजीनामा द्यायला हवा होता, ऐव्हढा अपमान त्यांचा झालेला होता. एखाद्या पक्षाला आपली किंमत नसेल, गरज नसेल तर अशा पक्षात लोक का थांबतात तेच कळत नाही. असो. आमदार काशिराम पावरा यांना मिळालेली राज्यातील सर्वाधिक मते ही आमदार अमरिभाई पटेल यांनाच मिळाली आहेत. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. प्रश्न काशिराम पावरा यांच्या प्रामाणिकपणाचा आहे ते स्वतःला कधीही आमदार समजत नाही, हे महत्वाचे आहे. यावेळी काशिराम पावरा यांचे बद्दल शिरपूर मतदार संघात नाराजी होती परंतू आमदार अमरिशभाई पटेल यांनी उमदेवार दिला म्हणजे मतदारांच्या दृष्टीने उमदेवार कोण हा विषय ंसंपलेला असतो. 1952 च्या लोकसभा निवडणूकीत धुळे जिल्ह्याचे खासदार स्व. चुडामण अण्णा पाटील यांना देशातून सर्वाधिक मते मिळाली होती. त्यावेळी प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते. त्या इतिहासाची पुनरावृत्ती आमदार अमरिशभाई पटेल यांच्या माध्यमातून आमदार काशिराम पावरा यांनी सर्वाधिक मते घेवून राज्याच्या विधानसभेत रेकॉर्ड केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रश्न असा आहे की शिरपूर मतदार संघात ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, लाडकी बहिण योजनेचा फायदा झाला का ? मराठा फॅक्टरचा परिणाम झाला का ? तर त्याचे एका वाक्यात उत्तर आहे शिरपूर तालुक्यात केवळ एकच ‘फॅक्टर’ चा प्रभाव असतो तो म्हणजे आमदार अमरिशभाई पटेल. आणि या वाक्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. कारण आमची लेखणी ही कुणाचीही ‘भाटगिरी’ करत नाही. जे लिहितो ते सत्यावरच आम्ही लिहितो, आणि ‘सत्यच’ आमच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघात अहोरात्र सेवा देणारे पटेल कुटूंबिय राज्यात सर्वाधिक मते घेणारे कुटूंबिय आहे त्यामुळे ‘जातीचा फॅक्टर’ त्यांचे कामापुढे फिका पडतो. म्हणून मागील आठ पंचवाषिक निवडणूकीत आ. अमरिश पटेल यांचा विजय होतो आहे. त्यांना विकासाचा एक ‘व्हिजन’ आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेवून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राची जाबाबदारी सोपवावी असे आमच्या समाजवादी मित्राला वाटते. आणि संदीप बेडसे, डॉ. जितेंद्र ठाकूर या तरूणांनी हंगामी राजकारण न करता आमदार अमरिशभाई पटेल यांचे अनुकरण करून मगच राजकारणात उतरावे असे मित्र या नात्याने आम्ही त्यांना सांगू इच्छितो. सर्वाधिक मते घेतल्याबद्दल आमदार अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा आणि त्यांच्या सर्व पदाधिकार्यांचे आम्ही अभिनंदन करतो. तूर्तास एव्हढेच....
0 Comments