Header Ads Widget

*अडचणीत असलेल्या सौ. मंजुळाताईंचा विजय सुकर कसा झाला!*




*धुळे* जिल्ह्यात पाचही जागा महायुतीने जिंकल्या. काँग्रेसचे पानिपत झाले. महायुतीच्या पाच विजयी जागात चार भाजपा व एक शिंदे सेनेची आहे. शिंदे सेनेला ही जागा साक्रीत मिळाली. साक्रीत पदावरील अपक्ष आमदार सौ. मंजुळाताई तुळशीराम गावितांना निवडणूक काळात शिंदे सेनेने प्रवेश देवून तिकीट दिले होते. धुळे जिल्ह्यात पाचपैकी चार जागा भाजपाने अगदी सहज व मोठ्या मताधिक्याने काढल्या, तेथे साक्रीत शिंदे सेनेने बर्‍यापैकी अतितटीत लढत देवून ही जागा काढली. सौ. मंजुळताई प्रस्थापितांशी संघर्ष करीत जनतेत गेल्या व विजयी झाल्या. साक्री मतदार संघात सुक्राम भुऱ्या मालुसरे नंतर सलग दुसर्‍यांदा यश मिळविणाऱ्या त्या आमदार ठरल्या. त्यांना १ लाख ४ हजार ६४९ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी खासदार बापू हरी चौरे यांचे चिरंजिव काँग्रेसचे तरुण उमेदवार प्रवीण बापू चौरे यांना ९९ हजार ६५ मते पडली. या मतदार संघात पूर्वी पासून तयारी करणारे व महायुतीत भाजपाला ही जागा जाणार हे गृहित धरून भाजपा तिकिटाचे इच्छूक असणारे, पण अपक्ष उमेदवार मोहन सुर्यवंशी इंजिनियर यांना १४ हजार २८८ मते पडली. लढत तिरंगीच दिसत होती. मात्र सौ. मंजुळा ताई गावित ५ हजार ५८४ एवढे मताधिक्य घेवून विजयी झाल्या. मतमोजणी प्रसंगीही बराच वेळ काँग्रेसचे प्रवीण चौरे पुढे राहात होते. त्यामुळे अतितटीच्या या शर्यतीत शेवटी कोण बाजी मारणार? याबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली होती. सौ. मंजुळाताई तशा मुळ भाजपाच्या. भाजपाच्या अवघ्या तीन नगरसेवकांच्या संख्येवर त्यांनी धुळे महानगर पालिकेचे महापौर पद मिळविले होते. त्यांचे पती तुळशीराम गावित देखील भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष होते. मागील वेळेस सौ. मंजुळाताईंनी तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी केली होती. तेव्हा बरीच मंडळी त्यांच्या समर्थनात उतरली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. दरम्यान राज्यात राजकीय स्फोट झाला. एकनाथ शिंदे सुरत मार्गे सेना आमदार घेवून गुवाहाटीला गेले. त्यावेळची विशेष गाजलेली बाब म्हणजे अपक्ष आ. मंजुळाताई देखील पाठिंब्यासाठी गुवाहाटीला गेल्या होत्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मंजुळा ताईंच्या या पाठिंब्याची कदर केली. त्यांच्या शब्दाला महत्व दिले. त्यांची बरीच कामे केली. मुख्यमंत्र्यांच्या गुड बुक मधल्या आमदार म्हणून त्यांचे वजन वाढले. मुख्यमंत्र्यांनी साक्रीत शासन आपल्या दारीचे कार्यक्रम घेतले. या सर्व घडामोडीत सौ. मंजुळा ताईंना प्रारंभी सपोर्ट करणारे काही नेते कार्यकर्ते कामांसाठी मात्र दुरावले होते. अशात निवडणूका लागल्या. त्यांना शिंदे सेनेचे तिकीट मिळाले. त्यांच्या समोर माजी खासदार पुत्र प्रवीण चौरेंना काँग्रेसने उमेदवारी दिली. काही प्रस्तापित मग प्रवीण चौरेंच्या पाठिशी उभे रहिले. निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात तर प्रवीण चौरेच बाजी मारतील, असे वातावरण तयार झाले होते. त्यासाठी मग खा. श्रीकांत शिंदेंचा साक्री दौरा झाला. शेवटी खुद्द मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेंची दहिवेलला सभा झाली. बंद पांझराकान साखर कारखाना, सुतगिरणी , नियोजित एम आय डी सी, पिंपळनेर गावातला राष्ट्रीय महामार्गाचा रखडलेला विषय हे प्रमुख गाजणारे विषय होते. साखर कारखाना व इतर कामांची आश्वासने त्यांनी दिली. वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. थोडे पॅचवर्क केले. त्याचा लाभ झाला. तरी देखील मतमोजणित प्रारंभी काँग्रेसचे प्रवीण चौरेंची आघाडी होती. शेवटी सौ. मंजुळा ताईंनी मताधिक्य मिळविले. या निवडणूकित नेत्यांपेक्षा जनरल पब्लिक - मतदारांनीच जास्त निवडणूक आपल्या हातात घेतल्याचे राज्यभर जाणवले आहे. लाडकी बहिण- हिंदुत्व - अडीच वर्षातला गतीमान कारभार आदींना जनतेने अप्रेसिएट केले. राज्यभरातच महायुतीच्या बाजुने जनमताचा कौल होता. त्या वातावरणाची प्रचिती साक्री मतदार संघातही आली. नेत्यांपेक्षा सामान्य मतदारच या वेळी डिसिजन मेकर ठरले होते. त्या प्रभावी वातावरणाचा लाभ साक्रीतही अतितटीच्या वातावरणात सौ. मंजुळाताई गावितांना मिळाला व त्या डेंजर झोन मधुन बाहेर येवून विजयी झाल्या.

(- *योगेंद्र जुनागडे,* धुळे )


Post a Comment

0 Comments