धुळे- आई-वडिल अत्यंत कष्टाने मुलांना उच्चशिक्षित करुन त्यांना परदेशी पाठवितात. मात्र त्यांच्या अंतिम समयी त्यांच्या मृत्यूनंतरही मुले न येता कॉलनीतीलच लोकांना सांगतात, आम्ही पैसे पाठवितो, तुम्ही तेवढे क्रियाकर्म करुन टाका ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट असून आई वडिलांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदाररी असते आणि ती काळाची गरज आहे. याची जाणीव समाजाने ठेवावी असे उद्गार, येथील शिवतिर्थ जेष्ठ नागरी संघात झालेल्या राज्यस्तरीय अ.खा.प्रेरणादायी महिला पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन
बोलतांना खान्देशचे प्रसिध्द साहित्यिक नानासाो.सुभाषजी अहिरे यांनी काढले.
स्व.नलिनी सूर्यवंशी यांच्या 5 व्या स्मृती दिनानिमित्त रविवार दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता गृहिणीपद सांभाळून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या 10 महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारार्थीत बागलाणच्या माजी आमदार सौ.दिपीकाताई चव्हाण, धुळ्याच्या अतिरिक्त आयुक्त करुणाजी डहाळे, नाशिकच्या गजलकारा सौ.मृणाल सुनील गिते, सोलापुरच्या सौ.उमा माळी, नंदुरबारच्या सौ.आरती बेलणकर, देवळ्याच्या वैशाली बच्छाव, सिन्नरच्या वैशाली वाघ, येवलाच्या जयश्री राठोड, धुळ्याच्या छायाताई बोरसे, धुळे आझादनगर पो.स्टेच्या सौ. राजश्री पाटील यांचा समावेश होता.
या प्रसंगी बोलतांना अभिनव खान्देशचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी समाजात अनेक गुणवंत प्रसिध्दीपासून दुर राहून समाजासाठी आपले कार्य, गृहिणीपद सांभाळून करीत असतात. म्हणून याची दाद घेऊन अ.खा. नेहमी त्यांना सन्मानीत करीत असतो आणि आमच्या या निस्वार्थ उपक्रमास पत्रकार बांधवही मोठ्या आत्मीयतेने प्रसिध्दी देत असतात. यावेळी सुरताल ऑर्केस्ट्राचे सुरेश चत्रे यांनी स्वत:हून कोणतेही मानधन न घेता या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काही देशभक्ती गिते सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यांचेही कौतुक करण्यात आले.
सदर पुरस्कारात सुंदर सन्मानचिन्ह, तर स्पार्कलचे सुबक सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि गुलाबपुष्प याचा समावेश होता. पुरस्कारासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली. याबद्दलही अ.खा. व खान्देश पत्रकार संघाकडून सर्वांचे आभार मानले.
----
0 Comments