धुळे: खरीप हंगामात रासयनिक खत विक्रीतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असतात. ते घडू नये यासाठी दक्षता बाळगताना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने जिल्ह्यातील ३२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने काही काळासाठी निलंबीत केले आहेत.
यात शिरपूर येथील दोन केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. यापुढेही फसवणुकीचे प्रकार समोर आल्यास कृषी केंद्र चालकांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून कृषि विक्री केंद्रांची तपासणी सुरु आहे. यात काही ठिकाणी खते, बियाणे व इतर निविष्टा विक्री करताना अनियमिता आढळली. त्यानुसार चारही तालुक्यांमध्ये कृषी निविष्टा केंद्राची सखोल तपासणी करण्यात आली. त्या वेळी जिल्ह्यात युरिया तसेच मागणी असलेली खते मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार समोर आली. कृषी विभागाने जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील खते विक्रेत्यांच्या तपाणीवर जोर दिला.
विविध त्रृटी आढळल्या
शेतकऱ्यांना गुणवत्ता व योग्य दरात कृषी निविष्टा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय गुणनियत्रंण निरीक्षक आणि भरारी पथकांचा तपासणी मोहीमेत समावेश झाला. यात युरीया खताच्या विक्रीमधील गैरप्रकारांवर लक्ष ठेऊन ई-पॉस आधारीत खतसाठा व गोदामामधील प्रत्यक्ष साठा, साठा रजिष्टरमधील प्रत्यक्ष साठा, युरीया खताची चढ्यादराने विक्री करणे, युरीया खतासोबत इतर खताची लिकिंग करणे, मासिक खत विक्री अहवाल सादर न करणे, विहित वेळेत खुलासा सादर न करणे आदी त्रृटी तपासणीवेळी आढळल्या. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांची जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सूरज जगताप यांनी सुनावणी घेतली.
३२ परवाने निलंबीत
सुनावणीदरम्यान कृषी केंद्र चालकांना बाजू माडण्याची संधी देण्यात आली. परंतु, त्यांचे म्हणणे समाधानकारक नसल्याने कृषी केंद्र चालकांचा किरकोळ खत परवाना महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. शिरपूर तालुक्यातून प्रथम ११ परवाने निलंबनाचे वृत्त `सकाळ`ने सोमवारी (ता. १८) प्रकाशित केले. ते वगळता परवाना निलंबनाच्या कारवाईमधील तालुकानिहाय कृषी सेवा केंद्र असे ः शिरपूर- धनलक्ष्मी ॲग्रो सेल्स (बोराडी, १५ दिवस), साक्री- त्रिमूर्ती ॲग्रो सर्विसेस (साक्री), तिरुपती कृषी सेवा केंद्र (सामोडे), श्रीराम समर्थ कृषी सेवा केंद्र (छडवेल कोर्डे), गितेश फर्टीलायझर (निजामपूर), स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र (धनेर), कन्हय्यालाल कृषी सेवा केंद्र (ब्राम्हणवेल, सर्व एक महिना निलंबीत), बानाई ॲग्रो सर्विसेस (साक्री, १५ दिवस), शिंदखेडा- उमेश कृषी सेवा केंद्र (कंचनपूर), विनोद कृषी धन (शिंदखेडा, १५ दिवस), इंदरचंद तुबांलाल जैन (दोंडाईचा), धनश्री कृषी सेवा केंद्र (मालपूर), पार्वताई ॲग्रो ॲण्ड हार्डवेअर (होळ), ओम कृषी सेवा केंद्र, (खर्दे, सर्व एक महिना).
दोघांवर कडक कारवाई
धुळे तालुका- पंकज फर्टीलायझर (लामकनी, १५ दिवस), धनदाई माता कृषी सेवा केंद्र (निमडाळे), भाग्यश्री कृषी सेवा केंद्र (धुळे), बालाजी फर्टिलायझर (बोरीस), रेणुका सर्वे सर्वो कृषी पुरक सहकारी संस्था (मेहेरगाव, सर्व एक महिना). कायमस्वरुपी रद्द- मयंक कृषी सेवा केंद्र (तऱ्हाडी), ओमसाई कृषी सेवा केंद्र (मांजरोद ,ता. शिरपूर).
0 Comments