धुळे : राज्यात अनेक ठिकाणी महिला आणि बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अशीच लाजिरवाणी घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात घडली आहे. एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना नुकताच घडली आहे.
याचा निषेध आणि नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शिरपूर तालुक्यात मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार काशीराम पावरा सहभागी झाले होते.
शिरपूर तालुक्यातील आठ वर्षीय बालिकेवर 15 ऑगस्ट रोजी अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आला. हा प्रकार समोर येतात तालुक्यात संतापाची लाट उसळली. हा संताप व्यक्त करण्यासाठी आणि आरोपी अनिल काळे याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज (18 ऑगस्ट) शिरपूर शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात रहिवाशांसह विविध संघटना, आदिवास समाज, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वत्र स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना नराधम अनिल काळे (वय 28) याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला आणि तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. एक मुलगी रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला आणि अवघ्या एका तासात आरोपी नराधम अनिल काळे यांच्या मुसक्या आवळ्यात आल्या. मात्र या लज्जास्पद घटनेमुळे शिरपूर तालुक्यास शहरात संतापाची तीव्र लाट पसरली आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (18 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता चोपडा जिनपासून मोर्चाला सुरुवात झाली. आदिवासी समाज, विविध संघटनांचे कार्यकर्ते आदी या मूक मोर्चात सहभागी झाले. या मूक मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मूक मोर्चाने उपविभागीय कार्यालयात पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना निवेदन दिले आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चात आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष धरती देवरे, मनोज पावरा, विलास पावरा आदी सहभागी झाले होते.
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी केल्याचे आमदार काशीराम पावरा यांनी सांगितले. तसेच या याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काहीही झाले तरी आरोपीली कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिरपूरवासीयांनी केला आहे.
0 Comments