Header Ads Widget

बीस साल से रोशन तुनेहर रोज अंधेरा नापा रे....कहाँ से आया, गया कहाहरफन मौला थापा रे.....


रोशन लालबहाद्दुर थापा (नेपाळी) वय वर्ष अवघे 35 असावे. सुमारे 25 वर्षापूर्वी तो नाशिकमार्गे धुळ्यात आला. ना ओळख, ना पाळख! धुळेकरांसाठीही तो कुठला? कोण? ना अता-पता. त्यावेळी त्याचे वय अवघे 15 म्हणजे खेळायचे बागडायचे, शिकायचे; पण याच वयात ‘पापी पेट का सवाल’ असल्याने साक्री रोडवर काही दुकानांवर त्याने कारागीर म्हणून नोकरी केली. अवघ्या 15व्या वर्षात त्याने साक्री रोड परिसरात उत्कृष्ठ कारागिर म्हणून नावलौकिक मिळविला होता. साक्री रोडवरील ‘साईकृपा’ या चायनीज दुकानाचे मालक प्रमोद, विनोद, छोटू या ढवळे बंधूंशी त्याची ओळख झाली आणि त्याच्या निष्ठावंत या भांडवलावर तो नोकर नव्हे तर ढवळे परिवाराचा सदस्य बनला. ढवळे परिवाराने त्याला आपल्या राहत्या इमारतीतच त्याची राहण्याची, जेवणाची कायमची व्यवस्था केली. केवळ त्याच्या चेहरापट्टीवरून तो ‘नेपाळी’  म्हणून तो त्याला ‘नेपाळी’ नाव कायमचे चिकटले. अन्यथा रोशन ढवळे खिवारी म्हणूनच त्याची ओळख झाली असती. अहिराणी, मराठी, सिंधी, खिवारीसह सर्व बोलीभाषांवर त्याचे प्रभुत्व होते. साक्री रोडवरील यशवंत नगर ही बहुसंख्येने जोशी-गोंधळी भटक्या समाजाची वसाहत. तेथे व परिसरात अक्षरश: तो ‘भटक्या’ म्हणूनच वावरला. घराघरात त्याच्या, ताई, माई, आक्का, भाभी होत्या. सर्वांशी आदरभावाने वागणे, नाते वय पाहुन  विनोदांची पेरणी करणे असे त्याचे बिनधास्त वागणे-जगणे होते. ढवळे परिवाराचे ज्येष्ठ फत्तु आप्पा ढवळे, सौ. शकुंतलाताई हे रोशनसाठी आई-वडीलांपेक्षा कमी नव्हते. रोशनच्या निधनाने प्रमोदभाऊचा उजवा हात निखळला.  ढवळे बंधू सोबतच त्यांच्या परिवारातील सूना सौ. मुक्ता, सौ. कविता या त्याच्यासाठी सख्ख्या वहिनीच होत्या. त्यांनी रोषणला दिलेली वागणूक सख्ख्या दिरापेक्षा कमी नव्हती. रोशनच्या निधनाचे वृत्त एैकुण यशवंतनगरमध्ये धुमधुडाक्यात होणारी गणपतीची स्थापना अतिशय साध्या पद्धतीने झाली. असा सर्व यशवंत नगर वासी व साक्री रोड परिसराचा चाहता, मित्र, सखा, भाऊ, मुलगा असलेला रोशन परवा अचानक इहलोक सोडून गेला. ही दु:खाची वार्ता परिसरासाठी धक्कादायक आणि आपल्या घरातील माणूस गेल्याची भावना होती. ढवळे परिवारासह सर्व यशवंतनगरवासी, परिसरातील अघोषित परंतु रोशनचे सच्चे जीवाभावाचे आप्तेष्ट यांनी रुग्णालयात धाव घेतली. उपचार व रोशनची सेवा करण्याची संधीही रोशनने मिळू दिली नाही,  म्हणून सर्वच हळहळले. ढवळे बंधूंनी धुळे शहरातील सर्वच नेपाळी बांधवांशी संपर्क साधला. त्यांच्यामार्फत नेपाळमधील समाज माध्यमांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या नातेवाईकांचा कुठेच संपर्क झाला नाही. म्हणून स्थानिक नेपाळी धुळेकर बांधवांच्या मदतीने अंत्यविधीचे सर्व सोपस्कार करण्याचा निर्णय ढवळे बंधूंनी घेतला.  रोशन धुळ्यात एकटाच आला; पण त्याच्या अंतिम यात्रेसाठी कुमार नगर स्मशानभूमीत परिसरातील भिमनगर, यशवंतनगर, शनिनगर, मोगलाई, कुमारनगर- साक्री रोड परिसरातील शेवटचा निरोप देण्यासाठी जमलेला सर्व जाती धर्माचा जनसमुदाय हीच रोशनच्या सेवाभावाची रोख रक्कम होती. साक्री रोडवासी असंख्य व्यावसायिक आपले व्यवहार बंद ठेऊन आले होते. अंत्ययात्रेप्रसंगी भर पावसात निसर्ग आपले अश्रु ढाळत होता. यशवंत नगर मधील दिव्यांग वृत्तपत्र विक्रेता अल्ताफ पठाण आपल्या तीनचाकीने सायकलला हॅण्डल मारत स्मशानभूमीत सहभागी झालेला पाहून तिरडीवरच्या रोशननेही अश्रु ढाळले असतील. ढवळे परिवारातील निधन झालेल्या योगेशचा मुलगा तेजस रोशनच्या प्रेताकडे पाहुन टाहो फोडून रडत होता.  ‘‘माझे वडील  सोडून गेले, रोशन काका आपणही सोडून चालला काय?’’  यापलीकडे घट्ट नाते दुसरे असु शकते काय? काल सायंकाळी मी ढवळे परिवाराच्या घरी भेटीसाठी गेलो असता, छोटू भाऊचा मुलगा तनुश उर्फ शिव हा अवघे चार वर्ष वयाचे बाळ जेव्हा, रोशन मामा दिसत नाही, मामा कुठे गेला? अशी चौकशी करीत असता माझेही डोळे पाणावले, रोषण मामा कुठे गेला? याचे उत्तर या शिव बाळाला कोण आणि कसे देणार? पण आजीने सांगितले, रोशन मामाला गणपती बाप्पाने नेले यावर त्याचे समाधान झाले. रोशन बेटा, तु कुठून आला? कसा आला? हे एक न सुटणारे कोडे असले तरी तुझ्या ‘खोडकर’ स्वभावासह पाव शतक तु साक्री रोड वासियांच्या हृदयात अढळ निर्विवाद स्थान मिळविले. तुला आम्हाला खांदा द्यायचा तर तुलाच खांदा देण्याची वेळ आली ही माझ्यासारख्या साक्री रोड वासिय ज्येष्ठ नागरीकांची खंत आहे. बेटा साक्री रोड वासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

तेरे खातीर आसमान भी

बरसात बनकर रोया रे....

तेरे रुप में ‘यशवंत’ ने

मस्त कलंदर खोया रे.....


- गो. पि. लांडगे,

ज्येष्ठ पत्रकार, धुळे

मो. 94227 95910

Post a Comment

0 Comments