धुळे: कुसुंबा (ता. धुळे) येथील शेताच्या शेडमध्ये विनापरवाना खतसाठा आढळला. विक्रीसाठी ठेवलेल्या या खत व जैव उत्तेजकांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकत सुमारे ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
स्वराज्य अॅग्रो कृषी माहिती केंद्राचा संचालक हेमंत चंद्रकांत पाटील (रा. वालचंद बापूजी नगर, मोहाडी, धुळे) याने कुसुंबा शिवारातील एका शेतशेडमध्ये खते व जैव उत्तेजकांचा साठा ठेवला होता. विक्रीचा कोणताही परवाना नसताना आर्थिक फायद्यासाठी त्याने हा साठा केला होता.
हा माल त्याने नाशिक येथील अॅग्रो खानदेशचे संचालक संदेश पवार यांच्याकडून खरेदी केला. शेतकरी व शासनाची फसवणूक करून या खतांची विक्री सुरू असल्याची तक्रार कृषी विभागाकडे आली. त्यावरुन जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण तायडे, सहायक कृषी अधिकारी मनोज पाटील व अमोल पाटील यांनी तेथे छापा टाकला.
या वेळी शेडमध्ये सुमारे ९८ हजार १२९ रुपयांचा खतसाठा व जैव उत्तेजक उत्पादने आढळली. पथकाने हा माल जप्त केला. याबाबत कृषी अधिकारी (गुण नियंत्रण निरीक्षक) तथा खत निरीक्षक मनीषा पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून हेमंत पाटील याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, खते नियंत्रण आदेश आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या विविध कलमान्वये धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
0 Comments