Header Ads Widget

धुळे जिप ‘खाऊगुली’मव्हाडी आचाडी रस्ताले ‘ना वाली’खड्ड टाई टाई चाले, आठे रस्तावर्ना गडीमौत हारतुरा धरी, तेना स्वागतले खडी

धुळे तालुक्यातील मोहाडी प्र. डांगरी आणि अमळनेर तालुक्यातील अंचळवाडी ही  धुळे -जळगाव या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरची गावे. दोन्ही गावांचे अंतर अवघे पाऊणेतीन कि.मी. त्यात धुळे जि.प. हद्दीत पाऊणे दोन आणि जळगाव जि.प. हद्दीत एक कि.मी. अंचळवाडी हद्दीतील एक किलोमीटरचे काम अमळनेरचे आमदार अनिलदादा पाटील यांनी गेल्या वर्षी आमदार निधीतून अवघ्या 22 लाखांत पूर्ण केले. ज्याचा समर्थ पाठ पुरावा
 अंचळवाडीचे सरपंच जिजाबराव विक्रम पाटील तथा जे.व्ही. नाना सर आणि अंचळवाडी ग्रामस्थांनी केला होता. एक किलोमीटर रस्ता आज चकचकीत झाला आहे. अगदी वाहन चालविताना पोटाचे पाणीही हलत नाही. इकडे मोहाडी हद्दीतील पाऊणे दोन कि.मी. रस्ता मात्र जीवघेणा ठरत आहे. अंचळवाडीच्या एक कि.मी.ला 22 लाख तर मोहाडीच्या पाऊणेदोन किलोमीटरला किती? याचा हिशोब केला तर धुळे जि.प. ला अवघड नाही. धुळे जि.प. च्या कामाचा लौकीक (!) सर्वदूर परिचित आहे. विकास कामांबद्दल पुढारी आणि अधिकारी यांची स्पर्धा सुरु असते, तू पुढे की मी?

मोहाडी गावाकडून अंचळवाडी मार्गे अमळनेरकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेतात जावे लागते. फोटोवरून रस्त्याची ‘लक्षणे’ दिसतात. अनेक दुचाकी धारक, शाळकरी विद्यार्थी दुचाकीवरून पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ‘‘बहीजू पाये जासू पण सायकल नको’’ असं म्हणत अनेक जण सायकलचे हँडल धरून पायी जाणे पसंत करतात. येथे खडीमुळे दुचाकी पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरात पंक्चर काढणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. अंचळवाडी गावाची 1 डिसेंबर रोजी यात्रा आहे. या यात्रेपर्यंत काम सुरु झाले नाही तर मोहाडी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून संघर्षाचा इशारा धुळे जि.प.ला दिला आहे. त्यात मोहाडीचे सरपंचांसह स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. सर्वश्री. विनोद नामदेव पाटील, विलास पाटील, राजेंद्र गुलाबराव पाटील (सामाजिक कार्यकर्ते), नगराज गुजर, सुभाष पाटील, जितेंद्र धनगर, अनिल धनगर, सागर माळी, राहुल धनगर, श्रीराम माळी, योगेश पाटील, भिकन माळी यांच्यासह अनेकांनी धुळे जि.प. ला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

 

 

अंचळवाडीला जागमातचे भव्य मंदीर आहे. रवंदळे कुळाची कुलदेवता आहे. येथे मार्गशीर्ष महिन्यात मोक्षदा एकादशीला भव्य यात्रा भरते. माजी खासदार स्व. चुडामणअण्णा पाटील, स्व. रोहिदास दाजी पाटील ते कुणाल बाबांपर्यंत ज्यांनी अनेक वर्ष धुळे जिल्ह्यात अधिराज्य गाजविले, त्यांच्याकडे सत्ता होती, शब्दाला वजन होते, त्या रवंदळे परिवाराचे हे कुलदैवत. या सर्वांनीच आपल्या निवडणूक प्रचाराला येथे श्रीफळ वाढवून शुभारंभही केला आहे. जनतेच्या रोषामुळे एक-दोन पराभव वगळले तर या जागमातेने नेहमीच या परिवाराच्या बाजुने कौल दिला आहे. मोहाडीने बऱ्याचदा स्व. अण्णासाहेब द.वा. पाटील यांना पाठबळ दिले. त्यांचे नातू आ. रामदादा भदाणे आणि माजी आमदार कुणाल बाबा दोघेही सत्ताधारी पक्षात आहेत. दोघांच्याही शब्दाला पक्षात सत्तेत ‘वजन’ आहे.  त्या अर्थाने ते राजे आहेत, ‘राजा बोले नी दल हाले’ याची प्रचिती येऊ द्या. उभयंतांसाठी पाऊणे दोन किलोमीटर रस्त्याचे काम म्हणजे ‘किस झाडकी पत्ती’ आहे. ते नक्की रस्त्याचे वाली होऊन काम मार्गी लावतील व मोहाडीच्या लढवय्या तरुणांना किरकोळ रस्त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी येऊ देणार नाहीत असा मला विश्वास आहे.

 

- गो. पि. लांडगे,

ज्येष्ठ पत्रकार, धुळे

मो. 94227 95910

Post a Comment

0 Comments