Header Ads Widget

*आरटीओंच्या बेडर भ्रष्ट्राचाराची लक्तरे सभागृहाच्या वेशीवर टांगली गेली!*


 *राज्यातील*  आरटीओ विभागातील बेधडक भ्रष्ट्राचाराची लक्तरे विधान परिषदेत  माजी मंत्री आ.अनिल परब यांनी टांगली. या विभागाचे अतिरिक्त आयुक्त कळसकर यांच्या बेडर भ्रष्ट्राचाराचा लेखा जोखाच त्यांनी पटलावर मांडला. हे इतके भयानक आहे, की सामान्य माणूस आवाकच होवून जाईल. परंतु या विभागातील लुटारुंच्या फौजा ज्यांना ज्ञात आहेत, त्यांच्यासाठी हे नवीन नाही. सरकारे कुणीही आली, कुणाचीही आली व गेली तरी या भ्रष्ट्रांना काहीही फरक पडत नाही. सरकार कुणाचेही असो, ते बरोबर खिशात घालतात. म्हणूनच हे कळसकर महाशय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बेधडक भ्रष्ट्राचार कसा करावा, सिस्टिमला खिशात कसे घालावे, हे शिकवित होते. साडेतीनशे पैकी २४५ आरटीओच्या  प्रमोशनचा प्रत्येकी ५० लाखाचा रेट बिनधास्त सांगत होते. त्यांना कुणाचीच काही भिती नाही. मुख्यमंत्र्यांची नाही, परिवहन मंत्र्यांची नाही, सचिवांची नाही जनतेची नाही, या अविर्भावात ते कनिष्ठ अधिकाऱ्यांना बिघडविण्याचे मार्गदर्शन करीत होते. वरून हे भाषण खुशाल रेकॉर्ड करा. म्हणत होते. आ. परब यांनी कळसकरच्या महाप्रचंड संपत्तीचे आकडेच सभागृहात पेश केले. राज्यात नगरविकास, आरटीओ, महसूल, गृह खात्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी परिवाराच्या केवळ कागदावरील शेल कंपन्या स्थापन करून त्यात भ्रष्ट्राचाराचे अब्जो रुपये व्हाईट केले आहेत. असे सर्वत्र नेहमी म्हटले जाते. ही बाब कशी सत्य आहे, हे आ. परब यांनी कळसकर परिवाराच्या नावावरील शेल कंपन्यांची नावेच सभागृहात उघड करून सर्वांना आश्चर्य चकित केले. या कंपन्यात एका टाचणी एवढेही उत्पादन होत नाही. कुठलेच औद्योगिक - व्यापारी - सेवा विषयक काम होत नाही. तरीही करोडो रुपयांची उलाढाल दाखविली जाते. काही लाखांना खरेदी केलेली जमीन तीस चाळीस पट अधिक रकमेत करोडोत विक्री केल्याचे दाखविले जाते. हा प्रकार एकटा आरटीओ आयुक्त कळसकर करतो असे नाही. आरटीओतले बरेच अधिकारी आज अब्जावधी मध्ये खेळत आहेत. जमीनीं मध्ये काळा पैसा पांढरा करीत आहेत. केवळ आरटीओ च नाहीतर नगरविकास विभाग, महसूल व पोलिस विभागाच्या उच्च बड्या अधिकार्‍यांकडे अशीच अब्जावधींची काळी माया जमा झाली आहे. हा भ्रष्ट्र कळसकर नाशिक मध्ये असतानाही तुफान गाजला होता. मंत्री संत्री खिशात ठेवत असल्याची गुर्मीयुक्त भाषा तो नेहमीच करतो. त्याचे व आरटीओ मधील कुणाचेच काहीच वाकडे  होत नाही म्हटल्यावर ही गुर्मी येणारच. आ. अनिल परबांनी विधान परिषदेत आरटीओची लक्तरे वेशीवर टांगणारे बरेच खळबळजनक भाषण केले. पण यातून काही कारवाई संभवत नाही. कारण वर पासून खालपर्यंत सारेच काही सडलेले आहे. कुणावर विश्वास टाकणार? उडदामाजी काळे गोरे काय शोधावे?

(  *योगेंद्र जुनागडे,* धुळे )


Post a Comment

0 Comments