Header Ads Widget

१९६६ च्या धुळ्यात न पडलेले कवठ आणि आमचे बालदिवस



धुळे.. न पडलेल्या कवठाची गोष्ट 1966 वडिलांची तळोद्याहून  धुळे कोर्टात बदली झाली. त्यामुळे धुळ्याला मालेगाव रोडच्या हनुमान व्हिल्हा शेजारी आमचे निवास स्थान. बाजूला दोन्ही तिन्ही काकाची घरे. समोरच बर्फचा कारखाना, ऑइल मिल. बाजूला, सरदारजीची वखार असा परिसर. हे सरदार म्हणजेच ST मधून ड्राइवर म्हणून retire झाल्यावर धुळ्यात पहिली रिक्षा आणणारे, सध्याचा ईश्वर स्पोर्ट च्या दिवंगत ज्ञानी चे वडील. हे ज्ञानी ही ST तच होते आणि उत्कृष्ट क्रिकेटपट्टू म्हणून प्रसिद्ध झाले होते असो 
      त्यावेळी बहुतेक मध्यम वर्गी्यांकडे बकऱ्या कोंबड्या पाळल्या जात आणि तेच उत्पन्नाचे एक साधनही असे. घरातील आई  बकऱ्या कोंबड्याच्या उत्पनातून ग्रॅम दोन ग्रॅम सोने त्याकाळी सहज घेत असे. 
      या बकऱ्यांना वेळ मिळेल तेव्हा आम्हा भाऊ बहिणींना चरविण्यासाठी न्यावे लागे. जवळच नालाही होता त्यामुळे बकऱ्यांना चारा मिळत असे तेथे एक पारिजातकचे झाड ही होते त्याचा फुलांचा वास आजही मनात सुवास देतो. दुसऱ्या बाजूला एक भले मोठे कवठाचे झाड होते.
त्यादिवशी असेच बकऱ्या घेऊन आम्ही तेथे आलो. कवठाच्या झाडाला मस्त कवठ लागलेले होते आणि जणू आम्हाला खुणावत होती. झाले भावांने आणि मी दगडे मारून ती पाडण्याचा प्रयत्न करू लागलो.. मात्र ते झाड खूप उंच आणि आम्ही 11/9 वर्ष्याची बारकी मुले. कश्याला उंचावर असलेली कवठ पडतील? कवठा लवकर तुटत नाही. दगडे मारून आम्ही थकलो.. पण एकही कवठ पडले नाही.. आमचीही गंमत समोरच्या बंगल्यातून एक मारवाडी बाई पाहत होती.. तिने आम्हाला इकडे या म्हणून आवाज दिला. तसे आम्ही या बंगल्यावर बराच वेळा ताक घेण्यासाठी येत असत. 1960/70 या काळात अनेक गावात काही मारवाडी सकाळी फुकट ताक लोकांना वाटत असत. ताक विकले तर दरिद्री येते असा इक समज गैरसमज होता कारण शिरपूरलाही आम्ही असे ताक आणत होतो असो
त्या मारवाडीणबाई म्हणाल्या, "बाळांनो, तुमच्याने ती कवठ पडणार नाही तुम्ही हे पैसे घ्या आणि बाजारातून विकत आणून खा "असे म्हणून आम्हाला पैसे देऊ केले. आता ते पैसे किती हे आठवत नाही मात्र कवठा साठी नक्कीच पुरेसे असतील. आम्ही पैसे घेऊन, बकऱ्यांना हाकलत घरी गेलो. आज या गोष्टीला 59 वर्षे झाली. आता त्या परिसरात ना तो नाला, ना तो कवठवृक्ष ना तो पारिजातक ना त्या बकऱ्या राहिल्या. मात्र पैसे देणाऱ्या त्या दयाळू मारवाडीणबाईची आठवण त्या पारिजातकासारखी सदैव मनात ताजेपणा आणि ऊर्जा देते हे नक्की. अशी आहे आमचीही ही न पडलेल्या कवठाची खरी गोष्ठ  स्मरणशक्ती शाबूत असल्यामुळेच अश्या आठवणी तुमच्याशी share करू शकतो हीही निसर्गाचीच कृपा!!!! 
प्रभाकर सूर्यवंशी, धुळे

Post a Comment

0 Comments