Header Ads Widget

गया एकादशी देखीपंढोरीले ‘पांडूरंग’


धुळे तालुक्यातील लामकानी येथील  न्यू इंग्लिश स्कुलचे आदर्श शिक्षक पांडूरंग ईश्राम पाकळे तथा पी.ई. पाकळे नाना आज ईहलोक सोडून गेले. जुन्या आठवणी डोळ्यासमोर तरळू लागल्या. नाना माझे वर्गमित्र. नानांची कन्या माझी भाचेसून. धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात शिक्षणासाठी श्रम करून शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी निवास’ मध्ये राहण्याची सोय असे. या ‘विद्यार्थी निवास’ चे आम्ही 55 वर्षापूर्वीचे विद्यार्थी. तत्काली पी.ई. नानांचा गरीबीशी असलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार आहे. नाना प्रकृतीने ‘वामन’ मूर्ती परंतु शिकण्याची उमेद असल्याने संघर्ष जिद्दीचा होता. त्यांना विद्यार्थी दशेपासूनच वर्क्तृत्वाची नैसर्गिक देण होती. विद्यार्थी दशेत असंख्य वर्क्तृत्व स्पर्धा त्यांनी गाजविल्या. बोलणे अगदी रोख ठोक आणि परखड. एखाद्याला राग आला तर, ‘‘तू तुना घर मी मन्हा  घर.’’ त्यांचा रागावण्याचा हेतू प्रामाणिक असे. इंग्रजी विषयावर त्यांची मास्टरकी होती. ग्रामीण भागाचा विद्यार्थी पुढे यावा,  इंग्रजीमुळे तो मागे राहू नये या उदात्त हेतूने ते विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन इंग्रजीसह विविध विषयाचे विनामूल्य धडे देत. चार भिंतीच्या शाळेतून निवृत्त झाल्यावरही बिन भिंतीच्या शाळेत ते शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. 1903 साली धुळे जिल्हा परिषदेने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला होता. ‘जे जे भेटे भूत, तया मानिजे भगवंत’ या संतांच्या आदेशांचे नानांनी सतत स्मरण ठेवून गरीब विद्यार्थ्यांना जेव्हा भेटत आणि त्यांच्या कथा-व्यथा ऐकत तेव्हा त्या विद्यार्थ्यांना भगवंत मानून आवश्यक ती मदत करत राहिले. लहानपणी विद्यार्थी दशेत भोगलेल्या दारिद्र्याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही,  म्हणूनच बालपणी गरीबीचे चटके सहन केलेल्या नानांनी गरीब मुलांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे यावे म्हणून अविरत त्यांची धडपड सुरु असे. नाना म्हणजे उत्साह आणि चैतन्याने रसरसलेले एक अजब रसायन होते. नाना खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. लग्न समारंभ असो की गंधमुक्ती किंवा सभा समारंभामध्ये ते आपल्या वक्तृत्वातून जे मार्गदर्शन करीत ते बिनतोड असे. त्यांचे बोलणेच संपू नये असे वाटे. काही वर्षापासून त्यांना बोलणे अशक्य होई. तरीही त्यांना काही तरी  बोलावे सांगावेसे वाटे. बोलतांना त्रास होत असतांनाही त्यांचे प्रबोधन सुरुच असे. ते शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून उपेक्षित आणि वंचितांसाठीचे समर्पित जीवन जगले. नानांचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन वेगळे नव्हते. नानांच्या किर्तीचा परिमल निश्चितच लामकानी पंचक्रोशीच्या भूमीत आनंद, प्रकाश देत राहील. मानवाला जन्माला घालणारा ईश्वर खरां की खोटा ? हा ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा भाग. मात्र विद्यार्थीरूपी कच्ची मडकी घडविणारे पाकळे नानांसारखे शिक्षकांचे ईश्वर रूप कसे नाकारता येईल?  नाना आज आपल्यात नाहीत परंतु नानांनी दाखविलेल्या वाटेवर चालणारा त्यांचा सुपुत्र खेमचंद पाकळे सरांच्या रूपाने खेमचंद सरांची शिक्षण पत्रकारिता राष्ट्र सेवा दल, शिक्षक भारती अशा विविध क्षेत्रातील सुरु असलेली समाज सेवेसाठीची धडपड नक्कीच नाना नसण्याची उणिव भरून काढेल असा मला विश्वास आहे. आपण सर्व खेमचंद सरांसह नानांच्या परिवाराच्या पाठीशी राहू या.  विद्यावर्धिनी महाविद्यालयात विद्यार्थी निवास मध्ये सोबत राहणारा, वर्गात एका बेंचवर बसणाऱ्या नानांशी आता भेट होणे नाही. ही मनात सल आणि वेदना आहेच. परंतु हा माझा कॉलेज सखा नामे पांडूरंग नेमका आजच एकादशीला पंढरीला चंद्रभागेत डुबकी मारायला तर गेला नाही ना?

 

‘‘ मान गरीबीनी मोडी,

भरा हयातीले रंग,

गया एकादशी देखी

पंढोरीले पांडुरंग.’’

  

- गो. पि. लांडगे, धुळे

मो. 94227 95910

Post a Comment

0 Comments