Header Ads Widget

*शेवाळे येथील अंगणवाडी सेविका पदभरतीत आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप**पाच वर्षांपासून महिलेकडून लाखो रुपये उकळल्याचा दावा; चौकशी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहनाचा इशारा*


शिंदखेडा (प्रतिनिधी): प्रभाकर धनगर.
शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील अंगणवाडी क्रमांक १ मधील सेविका पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक व अनियमितता झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया न राबवता आर्थिक व्यवहार करून संबंधित महिलेकडून रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.शेवाळे येथील रूपाली संजय माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सेविका पद गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रिक्त असून या काळात मदतनीस कर्मचाऱ्यांकडूनच कामकाज सुरू होते. दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी त्या व त्यांचे पती शिंदखेडा येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयात सीडीपीओ यांची भेट घेण्यासाठी गेले असता, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगून भेट टाळल्याचा आरोप आहे.यानंतर गावातील कार्यकर्त्यांसह एकात्मिक बाल विकास अधिकारी रवींद्र मराठे यांची भेट घेऊन रिक्त पदावर नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची विनंती करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी “एका जागेसाठी लोक लाखो रुपये देतात” असे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.यानंतर विविध माध्यमांतून दबाव टाकत बोरीस येथील प्रदीप साहेबराव पाटील व विनोद दंगल माळी यांच्या मार्फत 50 हजार रुपये रोख तसेच अमराळे फाटा येथे 20 हजार रुपये घेतल्याचा आरोप रूपाली माळी यांनी केला आहे. कोणताही अधिकृत जावक क्रमांक नसलेली आदेश प्रत न देता त्यांना अंगणवाडीत रुजू करण्यात आले. त्यांनी पाच ते सहा महिने काम केले व त्या काळात नियमित मानधनही मिळाले.मात्र साधारण एक वर्षानंतर कोणतेही लेखी कारण न देता कामावर येऊ नये असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा शिंदखेडा एकात्मिक बाल विकास कार्यालयात बोलावून आदेशावर जावक क्रमांक टाकण्यासाठी आणखी 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम भरण्यासाठी घरातील सोनं मोडून पैसे दिल्याचेही त्यांनी सांगितले. तरीसुद्धा आजतागायत त्यांना कायमस्वरूपी सेविका म्हणून रुजू करण्यात आलेले नाही.या संपूर्ण प्रकारामुळे रूपाली संजय माळी व त्यांच्या पतींची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून गेल्या पाच वर्षांपासून त्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.या प्रकरणाची धुळे जिल्हा एकात्मिक बाल विकास अधिकारी व शिक्षण विभागाने तात्काळ सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच रूपाली संजय माळी यांना शेवाळे येथील अंगणवाडीमध्ये सेविका पदावर तात्काळ रुजू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
जर या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घेण्यात आली नाही, तर दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असून, यास संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments