Header Ads Widget

*प्रजासत्ताक दिन-उत्सव की आत्मपरीक्षणाचा क्षण?...**इतिहास वारंवार साक्षी आहे-आग लावून आवाज दाबता येत नाही-पार्ट-3....*



*जनमत-*

*दोंडाईचा-*
२६ जानेवारी-हा केवळ तिरंगा फडकवण्याचा, संचलन पाहण्याचा किंवा भाषणांमधून देशभक्तीची उधळण करण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे भारतीय संविधान अंमलात आलेला, आणि “सत्ता जनतेकडून, जनतेसाठी व जनतेद्वारे चालेल” अशी शपथ घेतलेला दिवस.

प्रजासत्ताक म्हणजे अशी शासनव्यवस्था जिथे-राजा नाही, हुकूमशहा नाही
कुठल्याही एका घराण्याची किंवा गटाची मक्तेदारी नाही.कायदा सर्वांत वरचा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनता सर्वोच्च आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणी बंधुता ही केवळ सजावटीची शब्दमाला नाही, ती प्रत्येक नागरीकाच्या दैनंदिन आयुष्याची हमी आहे.

आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, पण त्याच वेळी गावागावांत प्रश्न उभे राहतात-विरोधकांना संपवण्याचे राजकारण, बिनविरोध निवडणुकांचा दबाव,पत्रकारांच्या लेखणीवर हल्ले कार्यालये, इमारती पेटवून आवाज दाबण्याचे प्रयत्न हे चित्र पाहून प्रश्न पडतो-ही लोकशाही आहे की दहशतीचे राज्य?ही प्रजासत्ताकाची वाटचाल आहे की संविधानाची हत्या?लेखणी जळते, पण सत्य जळत नाही
इतिहास वारंवार साक्षी आहे-
आग लावून आवाज दाबता येत नाही.पत्रकारांचे कार्यालय-दुकान जाळले जाऊ शकते,पण त्यांची लेखणी जाळता येत नाही.संविधानाच्या कलम १९ ने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कुणाच्या मर्जीवर अवलंबून नाही.ते हिरावून घेण्याचा प्रयत्न म्हणजे संविधानावर थेट हल्ला होय.

आज जर प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरवले जात असेल,तर उद्या गप्प बसलेल्यालाच गुलाम बनवले जाईल.बिनविरोध निवडणुका-लोकशाहीचा मृत्यू की सोयीचे राजकारण लोकशाहीत निवडणूक म्हणजे स्पर्धा, पर्याय आणि मतदाराचा अधिकार.भीती, दबाव , सौदेबाजी किंवा हिंसेतून मिळवलेली बिनविरोध निवडणूक ही विजयाची नव्हे, तर लोकशाहीच्या पराभवाची नोंद असते.संविधान मतदानाचा हक्क देतं,पण आज परिस्थिती अशी आहे की मत देण्याआधीच मत गुदमरते. हुतात्म्यांनी हेच स्वप्न पाहिले होते का?भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, असंख्य अज्ञात हुतात्मे-यांनी बलिदान दिले ते सत्तेसाठी नव्हे,तर स्वाभिमानानेजगणाऱ्या नागरिकांसाठी.त्यांचे स्वप्न असे नव्हते की-सत्ता टिकवण्यासाठी गाव पेटवले जातील.सत्य बोलणाऱ्यांना धमक्या दिल्या जातील आणि संविधान फक्त पुस्तकात उरेल.प्रजासत्ताक दिनाचा खरा अर्थ प्रजासत्ताक दिन म्हणजे-सत्तेला  प्रश्न विचारण्याचा हक्क अन्याया विरोधात उभे राहण्याचे धैर्य आणि संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी. आज खरा देशभक्त तो नाही जो फक्त घोषणा देतो,तर तो आहे जो संविधानासाठी उभा राहत, नेहमी एकटा असला तरी.

२६ जानेवारी हा फक्त साजरा करण्याचा नव्हे,तर स्वतःला विचारण्याचा दिवस आहे-
आपण नागरीक आहोत की प्रेक्षक?आपण प्रजासत्ताकात जगतो की भीतीत?जर आज गप्प बसलो,तर उद्या संविधानालाच गप्प बसवले जाईल.आणी आणखी एक शेवटचा सवाल…आपण प्रजासत्ताक झालो होतो तिरंगा फडकवण्यासाठी,की अन्यायासमोर मान ताठ ठेवण्यासाठी?उत्तर आपल्या कृतीत आहे-आणि तो निर्णय आज, या प्रजासत्ताक दिनी घ्यायचा आहे.
*जय संविधान.*
*जय लोकशाही....*

Post a Comment

0 Comments