प्रतिनिधी | शिंदखेडा
शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथील मूळ रहिवासी असलेले जयकुल गोकुलसिंह गिरासे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या सीएफए (चारर्टेड फायनान्सिएल अॅनालिस्ट)या अत्यंत कठीण परीक्षेत यश संपादन केले आहे. दीड वर्ष सोशल मीडियापासून लांब राहत, रोज आठ ते दहा तास अभ्यास केल्यानेच फायनान्स क्षेत्रातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये यश मिळवल्याचे गमक असल्याचे त्याने ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.
जयकुल यांचे वडील डॉ. गोकुलसिंह धनसिंह गिरासे यांनी शिंदखेडा येथे तब्बल दहा वर्षे स्वतःचे हॉस्पिटल यशस्वीपणे चालवले. क्रिकेट समालोचनाची विशेष आवड असल्याने ते पुढे मुंबईत स्थायिक झाले. आई विजया गोकुलसिंह गिरासे यांनी नेहमीच मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. जयकुल यांची मोठी बहीण डॉ. ग्रिष्मा गिरासे या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर असून कुटुंबातील शैक्षणिक परंपरा पुढे नेत आहेत. जयकुल सध्या मुंबईतील नामांकित पोद्दार महाविद्यालयात बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयीन अभ्यासासोबतच त्यांनी सीएफएसारखा कठीण कोर्स निवडून मोठे आव्हान स्वीकारले. एकाच वेळी दोन अभ्यासक्रम सांभाळताना त्यांच्यावर प्रचंड अभ्यासाचा ताण होता. मात्र, योग्य नियोजन, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. सीएफए अभ्यासासाठी त्यांनी ठाणे येथे क्लास लावला होता. जयकुल यांनी क्लासेससोबतच ऑनलाईन अभ्यास, विविध संदर्भग्रंथांचे वाचन आणि क्लास मटेरियलचा प्रभावी वापर केला. गेल्या दीड वर्षापासून त्यांनी सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहून दररोज ८ ते १० तास सीएफए परीक्षेच्या अभ्यासाला दिले. बीएफएम अभ्यासक्रमातही जयकुल महाविद्यालयात टॉपर असून परीक्षेत नेहमीच ओ+ श्रेणी मिळवत उत्तीर्ण होत आहेत. शिक्षण, खेळ आणि करिअर यांचा समतोल साधत त्यांनी मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
केवळ २० टक्केच विद्यार्थी होतात उत्तीर्ण
सीएफए परीक्षा ही जगभरातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ सुमारे २० टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होतात. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. पहिली व दुसरी परीक्षा एमसीक्यू स्वरूपाची असून तिसऱ्या टप्प्यात निबंधात्मक व्यक्तिनिष्ठ प्रश्नांसह काही एमसीक्यू असतात. हा कोर्स सीएफए इन्स्टिट्यूट, अमेरिका यांच्या मार्फत घेतला जातो आणि आंतरराष्ट्रीय मान्यता असल्यामुळे जगभरात उच्च पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
जयकुल यांची शैक्षणिक वाटचालही तितकीच उज्वल आहे. पाचवी ते आठवीपर्यंत त्यांनी कल्याण येथील नामांकित के. सी. गांधी हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले असून तेथे ते शालेय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. त्यानंतर दादर येथील आय. ई. एस. सुळे इंग्लिश मीडियम स्कूल मधून दहावी पूर्ण केली. ज्युनियर कॉलेजचे शिक्षण त्यांनी रुपारेल महाविद्यालयातून घेतले असून तेथेही ते क्रिकेट संघाचे कर्णधार होते. क्रिकेटमध्ये त्यांनी १४ वर्षांखालील व १९ वर्षांखालील राज्यस्तरीय संभाव्य संघात स्थान मिळवले आहे.
प्रामाणिक मेहनत आवश्यक
आयुष्यात उत्तुंग शिखर गाठायचे असेल तर आई-वडील, गुरुजन व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि प्रामाणिक मेहनत आवश्यक असते. आज मिळालेल्या या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असून त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मला लाभले.
- जयकुल गिरासे
0 Comments