शिंदखेडा यादवराव सावंत प्रतिनिधी : - शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत बनावट नियुक्तीपत्र देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.महिला व बालविकास विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने पदावर असताना तसेच सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्याचा गैरवापर करून अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सन २०२१ मध्ये कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया न राबवता,तत्कालीन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे (सेवानिवृत्त २०२३) यांनी शेवाडे येथे अंगणवाडी सेविका म्हणून दि.०२ एप्रिल २०२१ रोजी बनावट नियुक्ती आदेश दिल्याचा आरोप आहे.या आदेशाच्या आधारे संबंधित महिलेला PGMS प्रणालीद्वारे तीन महिन्यांचे मानधन देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील अनेक गावांतील महिलांकडून प्रत्येकी १ ते २ लाख रुपये घेतल्याचे, तसेच “तुमचे काम मी करून देतो” असे आमिष दाखवून मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.** धक्कादायक बाब म्हणजे, सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्याचा वापर करून दि.०७ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री लामकानी फाट्याजवळ कागदपत्रांवर सही व शिक्का मारण्यासाठी महिलेला बोलावण्यात आल्याचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचा दावा* तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.*
या प्रकरणी दि. १ जानेवारी २०२६ रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी, शिंदखेडा यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र, “सन २०२१ मध्ये कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही” असे उत्तर देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.भरतीच झाली नसेल, तर नियुक्ती आदेश व मानधन देण्याची प्रक्रिया कशी पूर्ण झाली? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा चिमठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील (सोनू फौजी) करत असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महिला, धुळे जिल्हा पालकमंत्री मा.जयकुमार रावल व बालविकास मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तीन दिवसांत कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे*
या गंभीर आरोपांमुळे महिला व बालविकास विभागाची विश्वासार्हता पणाला लागली असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
0 Comments