बेटावद (ता. शिंदखेडा) —
तालुक्यातील बेटावद येथे असलेले दूरक्षेत्र पोलीस ठाणे अत्यंत जुने व जीर्ण अवस्थेत असून अनेक वर्षांपासून नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीची मागणी होत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्याची पोलीस ठाण्याची इमारत अतिशय जीर्ण
झालेली असून पावसाळ्यात छताला गळती, भिंतींना तडे तसेच अपुऱ्या सुविधांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इमारत राहण्यायोग्य नसल्याने पोलिसांना येथे थांबणेही कठीण झाले असून, याचा थेट परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बेटावद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक लहान गावे, आठवडे बाजार, सण-उत्सव तसेच शाळा व महाविद्यालये असल्यामुळे नेहमीच मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात, चोरी, भांडणे व वादविवाद यांसारख्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. मात्र येथे कायमस्वरूपी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना दहा ते बारा किलोमीटर अंतरावरील नरडाणा पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागते.
यामुळे तातडीच्या घटनांमध्ये वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बेटावदसारख्या मोठ्या वस्तीच्या गावात सुसज्ज, प्रशस्त व आधुनिक सुविधांनी युक्त असे नवीन पोलीस ठाणे उभारणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच येथे कायमस्वरूपी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात यावा, अशीही जोरदार मागणी होत आहे.
बेटावद व परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, जुने पोलीस ठाणे हटवून नवीन इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, अशी ठाम मागणी केली आहे. नवीन पोलीस ठाणे उभारल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना सुरक्षिततेची खात्री मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments