धुळे (प्रतिनिधी) :
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत असलेल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत असले, तरीही शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची भावनिक मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आमचे शेतकरी माय-बाप आज नैसर्गिक आपत्तीमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. शासनाने जाहीर केलेले नैसर्गिक आपत्ती अनुदान, पिक विमा आणि कर्जमाफी अद्याप पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जगण्याचा संघर्ष करत आहे.”
याशिवाय गहू, हरभरा आणि मका या प्रमुख पिकांसाठी केंद्र व राज्य शासनाने हमीभावाने खरेदी करणारी केंद्रे तातडीने सुरू करावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. “हमीभाव केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने नेते ईश्वर पाटील स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मुख्यमंत्री महोदय, आपण विकास कामांसाठी येत आहात, त्याचे स्वागतच आहे. पण खरा विकास तेव्हाच होईल, जेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबतील. आमच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच आमची नम्र पण ठाम विनंती आहे.”
शिरपूर दौऱ्यावेळी या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments