पुणे | प्रतिनिधी
राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रियाशील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून संघटनेच्या भविष्यातील दिशा आणि कृती आराखडा निश्चित करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकशाही चळवळींमध्ये अग्रणी भूमिका बजावणाऱ्या राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात अनेक जनआंदोलने उभी केली असून विविध क्षेत्रांतील नेतृत्व घडवले आहे. बदलत्या राष्ट्रीय परिस्थितीत संघटनेला नव्या जोमाने उभारी देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ‘गांधी टॉक’ या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण होणार असून दिग्दर्शक किशोर बेळेकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण व उद्घाटन समारंभ पार पडेल. या मेळाव्याचे उदघाटक म्हणून सचीन गोस्वामी उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘आजचा आणि पुढचा भारत’ या विषयावर डॉ. अजय गुडावर्थी मार्गदर्शन करणार असून ‘संघटना चळवळींची नवी दिशा’ या विषयावर विवेक सावंत विचार मांडणार आहेत. ‘आपण समतावादी’ या विषयावर विनोद शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
त्यानंतर ‘राष्ट्र सेवा दलाचे भवितव्य आणि स्थानिक तसेच व्यापक कृती कार्यक्रम’ या विषयावर गटचर्चा आयोजित करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रात या चर्चांचे सादरीकरण करून पुढील दिशा ठरवली जाईल. सायंकाळी समारोपाने मेळाव्याची सांगता होईल.
या मेळाव्यास राज्यभरातून किमान ५०० क्रियाशील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली. प्रकाश कांबळे, झेलम परांजपे, युवराज मोहिते, राजाभाऊ अवसक, संजय गायकवाड, विलास किरोते, अश्विनी सातव आणि मनिषा पाटील हे आयोजनात सहभागी आहेत.
0 Comments