धुळे, दि. २२ एप्रिल २०२६ — सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या राज्यव्यापी बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस धुळ्यात उत्साहात व तीव्रतेने पार पडला. येथील कल्याण भवन येथे आयोजित ठिय्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत जोरदार, जोशपूर्ण आणि संतप्त घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात विविध विभागांतील कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. संजय पाटील, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र माळी, सचिव अविनाश मोरे, कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव, महसूल विभागाचे योगेश जिरे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रवीण राजपूत, निदेशक संघाचे डी. एच. देसले, वन विभागाचे सुधीर खैरनार व भुषण पाटील, पशुसंवर्धन विभागाचे प्रशांत साळुंखे, तलाठी संघटनेचे निलेश पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पवार, सरकारी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जितेंद्र सोनवणे व राहुल जगताप, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे प्रा. सतीश पाटील, पोलिस कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे गणेश हडपे व निवृत्ती भदाणे, तसेच जयराम पवार यांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या धोरणांवर टीका करत मागण्यांची जोरदार मांडणी केली.
महिला कर्मचारी संघटनेच्या प्रतिभा घोडके, पल्लवी शर्मा, स्वाती वाघ, सोनल कौजलगी, किशोरी अहिरे व शैलजा चव्हाण यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच सिटूचे काॅ. एल. आर. राव, वर्ग-४ कर्मचारी महासंघाचे मोहन कापसे व कैलास पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
दरम्यान, आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र करण्यासाठी उद्या दि. २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कल्याण भवन, धुळे येथून क्युमाईन क्लब, जेल रोड, धुळे येथे भव्यदिव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments