शिंदखेडा, प्रतिनिधी :
एस. एस. व्ही. पी. संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट अजय रविंद्र शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या थल सैनिक शिबिर (Thal Sainik Camp) मध्ये यशस्वी सहभाग नोंदवत शिबिर पूर्ण केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कॅडेट अजय रविंद्र शिंदे यांनी एनसीसी अंतर्गत आतापर्यंत एकूण सात प्रशिक्षण शिबिरे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. तसेच त्यांनी ऑब्स्टॅकल ट्रेनिंग (Obstacle Training) मध्ये उत्कृष्ट कौशल्य, शारीरिक क्षमता, धैर्य आणि चिकाटीचे प्रभावी प्रदर्शन करून विशेष प्रशंसा प्राप्त केली आहे.
त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि समर्पणामुळे त्यांची थलसैनिक शिबिरासाठी निवड झाली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशुतोष पाटील, एस. एस. व्ही. पी. संस्थेचे अध्यक्ष तसेच धुळे ग्रामीणचे माजी आमदार बाबासाहेब कुणाल पाटील, स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष बापुसाहेब प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष बापुसाहेब अशोकजी पाटील, सदस्य सुरेशजी देसले, एनसीसी अधिकारी डॉ. आर. टी. जाधव, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यांना एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. आर. टी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ४९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे व ए.ओ कर्नल पिनाकि बानिक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कॅडेट अजय रविंद्र शिंदे यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एन.सी.सी.मध्ये सहभागी होऊन नेतृत्व, शिस्त, देशभक्ती आणि व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
0 Comments