Header Ads Widget

​ *वारी आली वृक्षाची, दिंडी चालली वृक्षारोपणाची* !​ *शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे सी. बी. देसले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी; पर्यावरण संवर्धनाचा दिला मोलाचा संदेश*

*शिंदखेडा* 
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
सध्या होत असलेली वृक्षांची बेसुमार कत्तल आणि वृक्षारोपणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पर्यावरणाचा समतोल कमालीचा बिघडला आहे. ही बिकट परिस्थिती रोखण्यासाठी वृक्षलागवड व त्याचे संवर्धन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील भडणे  येथील कै. सी. बी. देसले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात टाळ-मृदंगाच्या गजरात अत्यंत उत्साहात 'वृक्षदिंडी' काढून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
​राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) आणि सामाजिक वनीकरण विभाग, शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा व संत रविदासजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी, ३० जुलै रोजी हा उपक्रम राबवण्यात आला. "वारी आली वृक्षाची, दिंडी चालली वृक्षारोपणाची" या संकल्पनेवर आधारित या दिंडीने संपूर्ण परिसरात पर्यावरण जागृतीचा विठू गजर घडवून आणला.
​वृक्षदिंडीच्या शुभारंभाप्रसंगी शाळेचे शालेय समिती चेअरमन भबूतराव देसले यांनी पालखीतील विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, विद्येची आद्य देवता माता सरस्वतीची प्रतिमा व रोपट्याचे पूजन केले. त्यानंतर फित कापून त्यांनी वृक्षदिंडीचे उद्घाटन केले.
​या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी महेश चव्हाण, वनपाल जगमोहन पाटील, पी. बी. देवरे, वनरक्षक प्रभाकर पाटील, रविंद्र ठाकरे, आणि डी. डी. सोनार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात 'एक पेड माँ के नाम' या अभियानांतर्गत विविध रोपांची लागवड करण्यात आली.
​हातात टाळ, झांज आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारे फलक घेऊन चिमुकले विद्यार्थी या आगळ्या-वेगळ्या दिंडीत सहभागी झाले होते. वारकऱ्यांच्या वेषातील विद्यार्थी आणि पर्यावरणाचा जयघोष यामुळे संपूर्ण भडणे परिसर दुमदुमून गेला होता. या उपक्रमास सारंग पाटील, जितेंद्र अहिरे व ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती संगीता वेंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
​या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कलाशिक्षक रावसाहेब बैसाणे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पाटील व निशांत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती अलका सूर्यवंशी, शरद पवार व निलेश पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
​"वृक्ष हे केवळ आपले सगे-सोबतीच नव्हेत, तर भावी पिढीच्या आरोग्यासाठी आणि शुद्ध हवेसाठी निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहेत. आज लावलेले प्रत्येक लहान रोपटे उद्याच्या समृद्ध आणि हरित भविष्याची पायाभरणी करेल. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गप्रेमाचे आणि पर्यावरणाचे संस्कार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे."असे
एस. ए. वाडिले (मुख्याध्यापक, कै. सी. बी. देसले विद्यालय)यांनी हयाप्रसंगी सांगितले.

Post a Comment

0 Comments