Header Ads Widget

*हरविलेल्या चार वर्षीय बालिकेची दोंडाईचा पोलिसांकडून २४ तासांत कुटुंबाशी पुनर्भेट*


दोंडाईचा, श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी यांचेकडून शहरातील मोनाली चौफुली येथे बेवारस अवस्थेत रडत फिरणाऱ्या चार वर्षीय बालिकेला दोंडाईचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तिच्या कुटुंबाशी सुखरूप पुनर्भेट घडवून आणत संवेदनशीलतेचा परिचय दिला.
३१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता एका जागरूक नागरिकाने मोनाली चौफुली परिसरात चार वर्षीय बालिका एकटी रडत फिरत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी पाठवून बालिकेला ताब्यात घेतले. ती घाबरलेली असल्याने आणि तिला घराचा पत्ता सांगता येत नसल्याने पोलिसांनी तिची समजूत काढून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती केवळ आदिवासी भाषेत स्वतःचे नाव "राधा" असल्याचे सांगू शकत होती.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच बालिकेचा फोटो विविध व्हॉट्सअॅप गटांवर प्रसारित करून शोधमोहीम राबवली. रात्रभर प्रयत्न करूनही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी आदिवासी समाजातील नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर सुनिताबाई प्रविण भिल यांनी फोटोवरून बालिकेला ओळखले. पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी आदिवासी भाषेत संवाद साधून खात्री केली असता, बालिकेचे नाव राधा प्रविण भिल (वय ४) असून ती ३१ जुलै रोजी सायंकाळी मांडळ चौफुली परिसरातून कुटुंबासोबत जात असताना हरविल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी राधा हिला तिची आई सुनिताबाई प्रविण भिल यांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केले. हरविलेली चिमुकली अवघ्या २४ तासांत परत मिळाल्याने आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

*ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक इमरान खान तसेच गुन्हे शोध पथकातील हिरालाल सूर्यवंशी, प्रविण निकुंभे, निलेश हालोरे, निलेश धनगर आणि पूजा आहिरे यांनी केली.*

Post a Comment

0 Comments