Header Ads Widget

आठे धुयाम्हाना चोर, भोंगा ऐकी व्हस खुशीम्हणे धन्यवाद दादा, जास कोपरामा घुसी...

धुळे - रोज कुठलंही वर्तमानपत्र उघडले की शहरात चोरी झाल्याची बातमी अटळ असते. अगदी एकाच दिवशी असंख्य घरफोड्या झालेल्या असतात. शहरात एकही  ‘चोरीमुक्त कॉलनी’ नाही. हे खेदाने म्हणावे लागते. बरं पुर्वीचे चोर फक्त रात्री चोऱ्या करायचे; परंतु चोरांचे तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की, अगदी पहाटेच्या साखर झोपेपासून सुर्याच्या प्रखर प्रकाशात दिवसाढवळ्या सर्वशक्तीनिशी त्यांचे हे काळे कारनामे लिलया सुरु असतात.  आपल्या सर्वशक्तीनिशी सुसज्ज पोलीस यंत्रणेलाही मी दोष देऊ इच्छित नाही. त्यांच्या विकसित तंत्रज्ञानानुसार  आणि त्यांच्या पद्धतीने ते सहज चोरीचा  तपास लावतात, कारण त्यांच्या ‘खबरी’ गुप्त  यंत्रणेला सराईत चोर माहित असतात. आणि  चोरांनाही चोरीची छड लावणाऱ्या पोलीसांची ‘छडी’ माहित असते आणि मग दुसऱ्या दिवशी वृत्तपत्र आणि समाज माध्यमांवर ‘चोर-शिपाई’ च्या पकडापकडीची बातमी झळकते आणि बातमी वाचून भयभीत जनतेच्या चेहऱ्यावर ‘विशाल आनंद’ झळकतात.
पूर्वी सायरन वाजवत पोलीस गाड्या मध्यरात्री यायच्या परंतु अलीकडे चोर मध्यरात्री झोपा झोडतात आणि रामप्रहरी चोरीकडे आपला मोर्चा वळवतात. त्यामुळे पोलीस वाहनांनीही आपली वेळ बदलली आणि कॉलन्या कॉलन्यातून पहाटेच्या प्रहरी भोंगा एैकु येतो. या पोलीसांच्या सायरन भोंगागाडीचे तंत्रज्ञान कळेनासे आहे.  सायरन वाजविण्याचा हेतू कळत नाही. ‘हम आये है’ याची भयभित जनतेला जाणीव करून देण्यासाठी त्यामुळे जनतेला नक्कीच धीर येतो. जनताही म्हणते ‘धीर धरी धिरापोटी, फळे रसाळ गोमटी’ दंगा-फसाद होत असेल तेथे भोंगा सायरनची गरजच आहे. पण तो चोरीसाठी बंगल्यात घुसून बसलेला चोर या भोंगा सायरनने बाहेर कसा येईल? आपला भोंगा त्याला लपून बसण्यासाठी ‘सावधानतेचा’चा इशारा नाही काय? पोलीसांची ‘तेजचल’ भोंगा गाडी एकदाची निघून गेली की पुन्हा ‘पिछेमूड’ होत नाही, हा गिरवलेला धडा चोरांच्या अंगवळणी पडला आहे. या धड्याचे ‘डिग्रीधारक’ चोरट्यांना पोलीसांची ‘थर्ड डिग्री’ केव्हा  आणि  कशी मिळेल? हा खरा कळीचा मुद्दा आहे. 
चोरीच्या उद्देशाने आपले अस्तित्व लपवून बसलेल्यांना पकडल्याच्या ‘छूटमुठ’ बातम्यांचा रतिब रोजच असतो. हे अस्तित्व लपविणारे छोटे-छोटे पकडलेच पाहिजेत अन्यथा ते पुढे इतके मोठे होतील की त्यातला एखादा केव्हा सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होईल हे सांगता येणार नाही. मायबाप जनता त्यांना खूर्चीवर बसवते. कारण राजकीय इतिहासाची पाने नजरेखालून घातले की लक्षात येईल की, निवडणूक काळात भाषणांचा फड रंगला की नेते मंडळी एकमेकांविषयी ‘कोण होतास तू? काय झालास तू?’  असं म्हणत एकमेकांवर कोंबडी चोर, रेतीचोर, डांबर चोर, खडी चोर, खिसेकापू  अशी उणी-दुणी काढत राजकारण्यांचा चोरावर मोर होण्याचा प्रयत्न आपण पहात असतो. 
पोलीस बंधूंनो आपला हेतू प्रामाणिक आहे. शंकेचे कारण नाही.  परंतु भोंग्याचा आऊटपुट काय? हे भयभीत जनता जनार्दनालाही कळू द्या. कर्तव्यदक्ष  जिल्हा पोलीस प्रमुख विशाल आनंद साहेब याची नक्कीच दखल घेतील असा मला विश्वास आहे. 
आठे  धुयाम्हाना  चोर , भोंगा ऐकी व्हस खुशी
म्हणे  धन्यवाद   दादा , जास  कोपरामा  घुसी...

- गो.पि. लांडगे,
ज्येष्ठ पत्रकार, धुळे
94227 95910 
 

Post a Comment

0 Comments