प्रतिनिधी | शिंदखेडा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. शाळा, निरगुडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी कार्तिकी भटेसिंग गिरासे हिने ३०० पैकी तब्बल २६० गुण मिळवत शिंदखेडा तालुका गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्हा गुणवत्ता यादीत १७ वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.
तसेच लावण्या मनोज पाटील हिने ३०० पैकी २५० गुण मिळवत तालुका गुणवत्ता यादीत ८ वा क्रमांक मिळवला आहे. मनन जितेंद्र गिरासे याने ३०० पैकी २३६ गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल सरपंच देवेसिंग गिरासे, ग्रामसेवक उमेश वाघ यांच्या उपस्थितीत तसेच विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती सीमा जयवंतराव वाघ यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक गौतम बाविस्कर तसेच सर्व शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या या यशाचे पालक, ग्रामस्थ व शैक्षणिक क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments