*जनमत-*
*दोंडाईचा-*
दोंडाईचा नगरीत मागील चार दिवसांपासून पाहुणचाराचा एक वेगळाच अध्याय अनुभवायला मिळाला.मुंबई-मुलुंड- डोंबीवली येथील सी.ए.बी.एम.सी. मुलुंड-डोंबीवली साहीत्य कट्टा क्लबचे प्रमुख श्री. मोहन पाठक आणि सौ.विजयश्री पाठक, श्री दिपक कुलकर्णी,सौ.दिप्ती कुलकर्णी, श्रीमती सुनंदा काळे, श्रीमती सुषमा कुलकर्णी, श्री शरद गोळे ,सौ.वंदना गोळे, श्री देवराम नाईक,सौ.सुरेखा नाईक, श्री काकासाहेब देवकर, श्रीमती नंदिनी कल्याण शेट्टी,
सौ.स्नेहल पाठक, श्री निल पाठक आदी त्यांच्या सोळा सदस्यांचा दोंडाईचा दौरा केवळ पर्यटनापुरता मर्यादीत राहीला नाही, तर त्याने साहीत्य, संस्कृती, शिक्षण, सामाजीक बांधीलकी आणि माणुसकीच्या नात्याला नवा अर्थ दिला आहे. गुरुवार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी रेल्वेने सकाळी दोंडाईचा नगरीत आगमन झाल्यानंतर दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेचे मा. नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे चेअरमन डॉ. बापूसाहेब रवींद्रजी देशमुख यांनी या सर्व पाहुण्यांचे ज्या आपुलकीने-दिलखुलास पद्धतीने स्वागत केले, ते पाहता आजच्या काळातील एक प्रश्न पुन्हा समोर येतो-नाती रक्ताची असतात की माणुसकीची?
कायद्याच्या भाषेत नातेसंबंधांचे अनेक प्रकार सांगता येतील, परंतु सामाजीक जीवनात एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या सुख-दुःखात उभे राहणे, आलेल्या पाहुण्याची चार दिवस मनापासून काळजी घेणे आणि कोणताही स्वार्थ न ठेवता आपलेपणाने वागणे, याला कोणत्या कलमात बांधणार? याचे उत्तर कायद्याच्या पुस्तकात नाही, ते माणुसकीच्या आचरणात आहे.
गावात आलेल्या पाहुण्यांची दादावाडी येथे चार दिवसांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. या काळात पाहुण्यांनी तोरणमाळ हिल स्टेशन येथे एक दिवस-एक रात्र घालवत निसर्गाचा आनंद घेतला. त्यानंतर बळसाणे-मालपूर गढी येथील जैन मंदिर आणि ऐतीहासीक परीसराची माहीती घेतली. तिसऱ्या दिवशी प्रकाशा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील तीर्थक्षेत्राला भेट देत तेथील धार्मिक आणि सांस्कृतीक वारशाची माहीती घेतली.म्हणजेच हा प्रवास केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा नव्हता, तो खान्देशच्या मातीशी, इतीहासाशी, संस्कृतीशी आणि माणसांशी जोडला जाण्याचा प्रवास होता.मात्र या संपूर्ण दौऱ्याचे वैशिष्ट्य केवळ पर्यटन नव्हते. साहित्य कट्टा क्लबच्या सामाजीक कार्याची व्याप्ती त्याहून मोठी आहे.महाराष्ट्रातील विविध सामाजीक व शैक्षणीक संस्थांना भेटी देऊन शक्य त्या पद्धतीने मदतीचा हात देण्याचे कार्य या मंडळींकडून केले जाते. याच सामाजीक बांधीलकीचा प्रत्यय दोंडाईच्यातही आला.ज्ञानोपासक शिक्षण मंडळीच्या वसुधा पब्लीक स्कूल, नूतन माध्यमीक विद्यालय आणि नूतन प्राथमीक विद्यालय या शैक्षणीक संस्थांना या मंडळींनी आज सकाळी भेट दिली. शाळेतील शैक्षणीक वातावरण, विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि संस्थेचे कार्य जाणून घेतले. यावेळी नूतन प्राथमीक विद्यालयाला आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत केवळ काही रकमेची देवाणघेवाण म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. शिक्षणासाठी दिलेला प्रत्येक हातभार हा भविष्यातील पिढीच्या उभारणीतील एक छोटासा पण महत्त्वाचा वाटा असतो.आज समाजात अनेक ठिकाणी क्षणिक प्रसिद्धीसाठी मोठमोठा खर्च केला जातो. त्यावर दिवे लागतात, व्यासपीठे सजतात, छायाचित्रे प्रसिद्ध होतात, मात्र दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी विस्मृतीत जातात. त्याच्या तुलनेत एखाद्या शाळेला दिलेली मदत एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात वर्षानुवर्षे प्रकाश निर्माण करू शकते.
*एक पैसा टाळ्या मिळवतो, दुसरा पैसा भविष्य घडवतो...* सी.ए.बी.एम.सी. मुलुंड-डोंबीवली साहीत्य कट्टा क्लबच्या सामाजीक कार्याची दिशा याच कारणामुळे वेगळी ठरते. कारण मदत ही केवळ आजच्या गरजेसाठी नसून उद्याच्या समाजनिर्मितीसाठी असते.याच सामाजीक बांधीलकीची पुढील पायरी म्हणून फेब्रुवारी २०२७ मध्ये गडचिरोली येथे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्या सामाजीक कार्याला मदत करण्याचा संकल्प या साहीत्य कट्टा क्लबकडून करण्यात आला आहे. त्यामुळे साहित्याची आवड जोपासतानाच सामाजीक उत्तरदायित्वाची जाणीव कृतीत उतरविण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे.
चार दिवसांच्या या प्रवासाचा समारोप आज रविवार, ४ ऑक्टोबर रोजी माजी कायदामंत्री डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख यांच्या निवासस्थानी झाला. यावेळी स्नेहपूर्ण चर्चा, विचारांची देवाणघेवाण आणि भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर रात्री आठ वाजता खान्देश एक्स्प्रेसने मुंबई-डोंबिवलीकडे परतीचा प्रवास सुरू झाला. परंतु रेल्वेने प्रवास संपला असला तरी या चार दिवसांनी निर्माण केलेले माणुसकीचे नाते संपले नाही.याच ठिकाणी डॉ. बापूसाहेब रवींद्रजी देशमुख यांच्या भूमीकेचा विशेष उल्लेख करावा लागेल. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना जवळच्या नात्यांसाठी वेळ नसतो. रक्ताचे नाते असूनही एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची तयारी कमी होत चालली आहे. अशा काळात दूर मुंबई-मुलुंड-डोंबीवलीहून आलेल्या सोळा पाहुण्यांची चार दिवस आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेणे, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणे, खान्देशची ओळख करून देणे आणि प्रत्येक क्षणी आपलेपणाची भावना जपणे-ही केवळ पाहुणचाराची बाब नाही,ही भारतीय संस्कृतीची जिवंत परंपरा आहे. ‘अतिथी देवो भव’ हा शब्द फक्त भिंतीवर लिहीण्यापुरता राहू नये, तर तो कृतीत उतरला पाहीजे, याचे उदाहरण दोंडाईच्यात पाहायला मिळाले.ज्या समाजात स्वार्थाच्या गणितावर नाती मोजली जातात, त्या समाजात कोणत्याही अपेक्षेशिवाय चार दिवस एखाद्याला आपले मानणे हीच खरी श्रीमंती आहे. घर मोठे असण्यापेक्षा मन मोठे असणे महत्त्वाचे असते, हे या संपूर्ण दौऱ्याने दाखवून दिले.
या चार दिवसांत साहित्य कट्टा क्लबच्या सदस्यांनी दोंडाईचा आणि खान्देशला केवळ पाहीले नाही, तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. मंदीर, गड, तीर्थक्षेत्र, निसर्ग आणि शिक्षणसंस्था यांना भेट देत त्यांनी स्थानीक इतीहास आणि संस्कृतीशी संवाद साधला. त्यामुळे हा दौरा पर्यटकांचा दौरा न राहता दोन भौगोलीक प्रदेशांतील माणसांना जोडणारा सांस्कृतीक सेतू ठरला आहे.
आज समाजासमोर मतभेद, राजकीय गटबाजी, स्वार्थी स्पर्धा आणि सामाजीक दुरावा यांची अनेक उदाहरणे आहेत.अशा परीस्थितीत साहीत्य, शिक्षण आणि सामाजीक कार्याच्या माध्यमातून माणसे एकत्र आणण्याचे काम करणाऱ्या संस्थांची गरज अधिक आहे.कारण शेवटी कोणत्याही शहराची ओळख त्याच्या मोठ्या मोठ्या इमारती- रस्त्यांना राजपथ नाव दिल्याने होत नाही, त्या शहरातील माणसांच्या वागणुकीने होते.
दोंडाईचा नगरीने या चार दिवसांत हीच ओळख जपली.साहीत्य कट्टा क्लबने आर्थिक मदतीच्या माध्यमातून सामाजीक उत्तरदायीत्व दाखवले, ज्ञानोपासक शिक्षण मंडळीने शिक्षणाची दिशा दाखवली, नूतन प्राथमीक विद्यालयाने या मदतीचा स्वीकार केला, आणि डॉ. बापूसाहेब रवींद्रजी देशमुख यांनी पाहुणचारातून माणुसकी जपली. डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या समारोपाने या स्नेहबंधाला भावनीक पूर्णविराम दिला.हा निरोप रेल्वेचा होता, नात्यांचा नव्हता.मुंबई-डोंबीवलीकडे जाणारी रेल्वे पुढे निघून गेली,पण तिच्यासोबत दोंडाईच्याची माती, खान्देशचा पाहुणचार, ज्ञानोपासक संस्थेची आठवण आणि या चार दिवसांत निर्माण झालेली माणुसकीची ऊब गेली आणि दोंडाईच्याच्या वाट्याला राहिली ती एक सुंदर जाणीव. रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण माणुसकीची नाती आपल्या वागण्यातून निर्माण करावी लागतात.आजच्या स्वार्थी आणि वेगवान जगात हीच नाती समाजाला पुन्हा जोडू शकतात. म्हणूनच सी.ए.बी.एम.सी. मुलुंड-डोंबीवली साहीत्य कट्टा क्लबचा हा चार दिवसांचा दोंडाईचा प्रवास केवळ एक कार्यक्रम म्हणून नोंदविण्यापेक्षा माणुसकीच्या सामाजीक दस्तऐवजाच्या रूपाने स्मरणात ठेवण्यासारखा आहे,असे मत गावात सुजाण नागरीकांमध्ये व्यक्त केले जात आहे.
0 Comments