प्रतिनिधी l शिंदखेडा : अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ, श्रीक्षेत्र जाळीचा देव, बुलढाणा यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्रीमद्भगवद्गीता ज्ञानपरीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा शिंदखेडा येथे बिजासनी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
दि. ९ ऑगस्ट रोजी झालेल्या या परीक्षेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील विविध शाळा, महाविद्यालये व अध्यापक विद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यस्तरावरील २, धुळे जिल्ह्यातील ११ आणि नंदुरबार जिल्ह्यातील ३ गुणवंत विद्यार्थ्यांची बक्षिसांसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
परमपूजनीय परममहंत पाथरीकर बाबा महानुभाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष परमपूज्य परममहंत लोणारकर बाबा महानुभाव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये भगवद्गीतेतील विचार, संस्कार, नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीची जडणघडण व्हावी, या उद्देशाने गेल्या ३० वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
शाळा व शिक्षकांचाही गौरव
ज्ञानपरीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गीतेतील जीवनमूल्यांची ओळख करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या शाळांचा ‘उपक्रमशील आदर्श शाळा’ म्हणून, तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श उपक्रमशील शिक्षक’ म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख तथा गीता परीक्षा संपर्कप्रमुख बी. एल. सोनवणे (आप्पा) यांनी नियोजन व पाठपुरावा केला. शिरपूर-शहादा तालुकाप्रमुख श्रीमती पौर्णिमा पाटील यांचेही सहकार्य लाभले. विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भगवद्गीतेतील विचार विद्यार्थ्यांच्या आचरणात रुजवून त्यांच्यात शिस्त, सदाचार, मूल्यनिष्ठा आणि चारित्र्यसंपन्नता निर्माण करणे, हा या ज्ञानपरीक्षेचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संस्कार व जबाबदार नागरिकत्वाची प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार मानले.
या मान्यवरांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी गटनेते अनिल वानखेडे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रजनी वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक उदय वानखेडे,श्रीमती सुजाता वानखेडे, जनता हायस्कुल अध्यक्ष मनोहर पाटील, विकास विद्यामंडळ नरडाणा अध्यक्ष सत्यजित सिसोदे, का स माळी विद्यालय भामेर अध्यक्ष सुभाष सोनवणे, शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट अध्यक्ष स्वप्निल देसले,शेतकरी बोर्डिंग संस्था अध्यक्ष वाल्मीक दंगल पाटील,नंदुरबार उद्योजक प्रशांत माळी, एस टी केंद्रीय कामगार नेते सुभाष जाधव,माजी उपगराध्यक्ष भिला पाटील,भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, भाजपा शिंदखेडा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन,योग गुरु डॉ ओंकारभाई सोनी, प्रा अनिल माळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
0 Comments