पुरवठा निरीक्षक छोटू श्रावण चौधरी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, निरीक्षक चौधरी, हर्षा महाजन यांनी चितोड रोड परीसरातील रेशन दुकान क्रमांक ४१ आणि ७९ ची तपासणी केली. तेव्हा दुकान क्रमांक ७९ मध्ये सेल्समन सचिन ब्राम्हणकर उपस्थित होता. दुकानधारक श्रीमती जे. डी. मुकुंदे उपस्थित नव्हत्या. तपासणी पथकाने सेल्समन ब्राम्हणकर याला धान्य साठ्याबाबत विचारपूस केली. त्यावेळी मे २०२२ मध्ये कोणताही साठा दुकानास पुरविण्यात आला नाही, असा युक्तिवाद ब्राह्मणकर याने केला.
पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांनी दुकानातील धान्यसाठा व विक्री रजिष्टरची मागणी केली. ब्राह्मणकर यांनी ते तपासणीसाठी उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे स्थितीचा पंचनामा करण्यात आला. नंतर या दुकानाबाबत मे २०२२ मध्ये किती धान्यसाठा पुरविण्यात आला याची माहिती शहरातील शासकीय धान्य गोदामातून घेण्यात आली. त्यात या रेशन दुकानास १० व ११ ला जूनला धान्य गोदामातून वाहन क्रमांक (एमएच १८ एए १७०९) मधून धान्यसाठा पुरविण्यात आल्याची माहिती पुढे आली. यात अंत्योदय योजनेतील अडीच क्विंटल गहू, दहा क्विंटल तांदूळ, सव्वानऊ क्विंटल ज्वारी, ०.६१ किलो साखर, प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आठ क्विंटल गहू, २५ क्विंटल ५० किलो तांदूळ, आठ क्विंटल २० किलो ज्वारीचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा साठा प्राप्त झाल्याची पोच पावती तपासणी पथकाला मिळाली. धान्यसाठा स्वीकारल्याच्या पावतीवर श्रीमती मुकुंदे यांची स्वाक्षरी आहे. रेशन दुकानाचे अधिकार पत्र श्रीमती मुकुंदे यांच्या नावावर असूनही त्या उपस्थित न राहाता त्यांनी ब्राम्हणकर याला हाताशी धरून धान्यसाठा काळ्या बाजारात विक्री केला. सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेशाच्या तरतुदीचा भंग केला. त्यामुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
''रेशन दुकानदारांनी प्रामाणिकपणे कामकाज करावे. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. सध्या दोन वेळा धान्य द्यावे लागत आहे. त्यामुळे ते काही वेळा दुकानात उशिरा येते. पात्र लाभार्थ्यांनी हक्काचे धान्य घ्यावे. यंत्रणेकडे सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य, साखर उपलब्ध आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांनी साखर घ्यावी.'' - रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा विभाग, धुळे
0 Comments