महाराष्ट्रातील शाळा व शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कालपासून मुंबईच्या विधानभवनासमोर सुरू असलेल्या आमच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राज्याचे शिक्षणमंत्री मा. दीपक केसरकर साहेबांनी आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व आंदोलकांना चर्चेला बोलावले. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांच्याकडे शिक्षक बांधवांच्या सर्व मागण्या मांडल्या. दोन दिवसांच्या ठिय्या आंदोलनाच्या प्रयत्नानंतर शेवटी मागण्या मान्य केल्या. त्यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी मंत्री महोदयांनी चर्चा करून या सर्व मागण्यांबद्दलची घोषणा केली.
१५ नोव्हेंबरपर्यंत त्रुटी पात्र शाळा, सर्व अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांची पात्र यादी घोषित करणार व येणाऱ्या हिवाळी आधिवेशनात अनुदानाची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आजपर्यंत कोणतेही अनुदान नसलेल्या शिक्षक बांधवांसाठी हा खूप महत्वाचा निर्णय आहे, कारण ते सर्व आता अनुदानावर येणार आहेत. याचा सुमारे ३० हजार शिक्षकांना लाभ होणार आहे. अजूनही २०% व ४० % अनुदानावर जे शिक्षक आहेत, त्यांना अतिशय तुटपुंजे वेतन सुरू असून प्रचलित पद्धतीनुसार त्यांना अनुदान मिळावे यासाठीही माझे प्रयत्न सातत्याने चालू राहणार आहेत. तसेच वाढीव पदांवरील शिक्षक व जुनी पेन्शन योजना या संदर्भात मा. शिक्षण मंत्री महोदयांसोबत १ नोव्हेंबरला पुन्हा बैठक होणार आहे.
या आंदोलनात माझ्यासोबत मा. आ. बाळाराम पाटील (शिक्षक आमदार, कोकण), मा. आ. किशोर दराडे (शिक्षक आमदार, नाशिक), मा. आ. अॅड. अभिजित वंजारी (पदवीधर आमदार, नागपूर), मा. आ. अॅड. किरण सरनाईक (शिक्षक आमदार, अमरावती) मा. आ. जयंत आसगावकर (शिक्षक आमदार, पुणे) यांच्यासह आज औरंगाबादचे विधानपरिषद सदस्य मा.आ. राजेश राठोड देखील सहभागी झाले होते.
आमच्या सर्वांच्या एकजुटीचा हा विजय आहे. शिक्षक बांधवांच्या हक्कांसाठी माझा हा लढा यापुढेही अविरतपणे असाच सुरु राहील.
0 Comments