Header Ads Widget

कोन्ही म्हैस अन्‌ कोन्हले उठबैस! पालिकेची यंत्रणा माणसाळलेली मात्र विज वितरण कंपनी ‘अंग्रेज जमाने की’च





धुळे- पावसाच्या परतीवर का असेना, विज वितरण कंपनीने ज्या तत्परतेने (!) साक्री रोडवरील विद्यावर्धिनी मागील मलेरिया ऑफीस परिसरात विजेच्या तारांवरील झाडी-झुडपी, फांद्या छाटल्या त्याबद्दल नक्कीच ते कौतुकास पात्र आहेत. ज्या तत्परतेने त्यांनी फांद्या छाटल्या. मोठ्या ओंडक्यांची विल्हेवाट लावली   त्याच तत्परतेने त्यांनी फांद्या व पालापाचोळ्याची  विल्हेवाट लावली असती तर त्यांची कर्तव्यतत्परता दिवाळीच्या  मुहूर्तावर अधिक उजळून निघाली असती. आठवड्याहून अधिक कालावधी लोटला तरी अद्याप या फांद्या उचलण्यात आल्या नाहीत. गटारीला आश्रीत झालेल्या या फांद्यांसाठी गटारीचे पाणी रोखून धरले आहे. डास-मच्छर मोठ्या प्रमाणात तेथे आपला तळ ठोकून आहेत. या फांद्यांबाबत पालिका म्हणते, आम्ही त्या गावचेच नाहीत. विज वितरण कंपनीने तोडलेल्या फांद्या उचलण्याची जबाबदारी आमची नाही. विज वितरण कंपनी व पालिका यांचा ताळमेळ नसल्याने सर्वच गोंधळात गोंधळ दिसून येत आहे.  मलेरिया ऑफीस लगत छायाचित्रात दिसणारा गटारी लगतचा गटार पाईप सहा महिने उलटले तरी गटारीवर तसाच पडून आहे. हा बेजबाबदारपणाचा कळसच झाला. अशीच अवस्था सिंचनभवनमागील सामाजिक न्याय भवनच्या गटारी लगत आहे. या दोन्ही यंत्रणांचा ताळमेळ नसेल तर मुक्या बिचाऱ्या जनतेने दाद मागायची तरी कुणाकडे?पालिकेची माणसे तरी थोडी फार माणसाळलेली आहेत. एैकुण तरी घेतात परंतु विज वितरण कंपनीच्या या सज्जन माणसांना प्रश्न विचारण्याची सोयच नाही. त्यांची उत्तरे ‘अंग्रेज जमाने की’ आठवण करून देतात. मलेरिया ऑफीस पासुन अजबेनगरपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर महावीर कॉलनी प्रवेश द्वार, सप्तश्रृंगी कॉलनी, परिसरात काटेरी बोरी बाभळी व विजेच्या तारा या एकमेकांमध्ये एव्हढ्या गुरफटल्या आहेत तर शोधूनही विजेच्या तारा दिसत नाही. वृक्षवल्ली आणि विजेच्या तारा यांचे सर्वच गुण्यागोविंद्याने सुरु आहे म्हणून ठीक आहे. परंतु या झाडीझुडपातून तारांची मुक्तता करा असे अनेक वेळा विज कर्मचाऱ्यांना सांगितले तर ते बहिरेपणाची भूमिका स्विकारतात. वरिष्ठ साहेबांचा नंबर विचारला तर माहित नाही असं सांगून मोकळे होतात. मोगलाई युनिटचा टेलीफोन लावला तर रिसिव्हर बाजुला असतो किंवा ‘नो-रिप्लाय’ मिळतो. अनेकदा शॉर्ट सर्कीटचे अग्निउपद्रवच्या घटना घडत असतात. त्यावेळी जनतेने संपर्क साधायचा तरी कुठे? त्यापेक्षा मोगलाई युनिटचा लॅण्ड लाईन फोन राजवाडे संशोधन मंडळाच्या पुरातन वस्तुसंग्रहालयात ठेवला तर त्याच्यासह मोगलाई युनिटचा नावलौकीक तरी होईल. वारंवार गेलेल्या विजेची चौकशी करावी तर ‘वरून गेली आहे’ हे नेहमीचे उत्तर ठरलेले. हे वरून-वरून नेमकी काय भानगड असते? त्याचा उलगडा होतच नाही. मोगलाई युनिटला ‘करंट’ कमी पडतो की काय? याची शंका येऊ लागली आहे.

विज वितरण कंपनी आणि धुळे महानगरपालिका यांना आमची नम्र विनंती आहे, बाबांनो लाईट पोल, दिवे, तारा, झाडीझुडपी यांची कामे करतांना एकमेकांत ताळमेळ ठेवा, टाळाटाळ करून एकमेकांच्या अंगावर जबाबदारी ढकलून ‘चिलम तमाखू वो घरकू’चा खेळ थांबवा, सामान्य जनतेला उल्लू बनवू नका. ही तुमची संयुक्त जबाबदारी आहे. अहिराणी सांगायचे तर, ‘कोन्ही म्हैस आणि कोणले उठ बैस’ असे करू नका असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी महापालिका व विजवितरण कंपनीला केले आहे.


Post a Comment

0 Comments