ठाणे,दि.१३ (प्रतिनिधी)
राज्यातील विविध महापालिका तसेच स्थानिक स्वराज क्षेत्रातील परवडणारी घरे पत्रकारांना उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली असून मुख्यमंत्री महोदयांनी सदर मागणीबाबत सकारात्मकता दर्शवुन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, यासंदर्भात लवकरच बैठक बोलावुन निर्णय घेतला जाईल.असेही त्यांनी आश्वासित केले. दरम्यान, हा निर्णय तडीस गेल्यास ग्रामीण भागातील श्रमिक पत्रकारांच्या हक्काच्या घरकुलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील शेकडो पत्रकारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न धसास लावल्यानंतर आता ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील पत्रकारांच्या घरकुलासाठी पाठपुरावा सुरु आहे. या पार्श्वभुमीवर ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र जनमुद्रा संपादक डॉक्टर दीपक दळवी, पुढारीचे ठाणे ब्यूरो चीफ दिलीप शिंदे,ठाणे वार्ताचे संपादक अमोल सुर्वे, छायाचित्रकार अतुल मळेकर आदी उपस्थित होते.मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष दिलीप सपाटे हेदेखील यावेळी उपस्थित होते.तर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी पत्रकारांच्या घरा संबंधीच्या या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला आहे.
राज्यभरातील पत्रकारांना त्या त्या महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत. याबाबतचे निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी आपण या विषयावर बैठक बोलावुन सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासित केले.यापूर्वी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी कीणीकर यांनीही मुख्यमंत्र्यांना याबाबतचे एक पत्र नगरविकास मंत्री असताना दिले होते.म्हाडाचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री उदय सामंत हे सुद्धा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतचा पाठपुरावा करणार आहेत.त्यांच्या काळात ठाण्यातील पत्रकारांच्या घरांचा प्रस्ताव म्हाडाच्या केलेल्या ठरावानंतर प्रलंबित आहे. तरी त्याबाबतही तातडीने निर्णय घेऊन ठाण्यातील पत्रकारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावावा. याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
सदर निवेदनावर सही केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी, याबाबत आपण लवकरच बैठक घेऊन योग्य तो निर्णय करणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार प्रताप सरनाईक हे सुद्धा याबाबतच्या निवेदना संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक लावून प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. सदरचा धोरणात्मक निर्णय झाल्यास या परवडणाऱ्या घरांच्या योजनेचा लाभ राज्यभरातील ग्रामीण भागातील कमी वेतन आणि मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांना होणार आहे.
यावेळी ठाणे शहर व जिल्ह्यातील पत्रकारांना ठाण्याच्या कोलशेत येथे अशर बिल्डर्सने उभारलेल्या इमारतीमध्ये उपलब्ध झालेली परवडणारी घरे देण्याबाबतच्या प्रलंबित असलेल्या प्रस्तावाकडे लक्ष वेधुन पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने नगरविकास विभाग त्याचबरोबर म्हाडा प्राधिकरणाच्या अखत्यारीतील घरांबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.
0 Comments